मुंबई - 'बाहुबली' आणि 'आरआरआर' सारखे मास अॅक्शन ड्रामा चित्रपट बनवणारे साऊथचे सुप्रसिद्ध दिग्दर्शक राजामौली यांनी त्यांच्या पुढील चित्रपटासाठी कॅमेरा सज्ज केला आहे. विशेष म्हणजे, राजामौली यांनी गेल्या तीन वर्षांपासून कोणताही चित्रपट दिग्दर्शित केलेला नाही. २०२२ मध्ये राम चरण आणि ज्युनियर एनटीआर स्टारर 'आरआरआर' हा त्यांचा शेवटचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. साऊथमध्ये प्रत्येक चित्रपट हिट दोणाऱ्या राजमौली यांनी आपल्या आगामी चित्रपटात टॉलीवूडचा राजकुमार म्हटल्या जाणाऱ्या महेश बाबूला नायक म्हणून घेतलं आहे. एसएस राजामौली आणि महेश बाबू याचा 29 वा चित्रपट यांची आद्याक्षरे घेऊन 'एसएसएमबी२९' हे तात्पुरते शीर्षक तयार करण्यात आले आहे. हा चित्रपट गेल्या तीन वर्षांपासून चर्चेत आहे. आता राजामौली यांनी त्यांच्या नवीन पोस्टमध्ये सांगितलं आहे की चित्रपटाचं काम सुरू होणार आहे. राजामौली यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये ते सिंहाबरोबर हसताना दिसत आहेत. प्रियांका चोप्रानं ही पोस्ट लाईक केली आहे आणि तिनं सांगितलं आहे की, ती या चित्रपटात दिसणार आहे.
एसएस राजामौली यांची पोस्ट - आज एसएस राजामौली यांच्या इंस्टाग्राम पोस्टनं चाहत्यांमध्ये खळबळ उडवून दिली आहे. या व्हिडिओमध्ये राजामौली हातात भारतीय पासपोर्ट धरून आहे आणि त्यांच्या मागे पिंजऱ्यात बंद सिंहाकडं पाहताना हसत असल्याचे दिसत आहे. आता राजामौली यांनी त्यांच्या पोस्टला 'कॅप्चर्ड' असे कॅप्शन दिलं आहे. दरम्यान, महेश बाबू यांनी या पोस्टवर तेलुगूमध्ये आणि प्रियांका चोप्रानं हिंदीमध्ये कमेंट केली आहे. प्रियांका चोप्रानं अखेर या पोस्टवर एक कमेंट पोस्ट केली आहे.
प्रियांका चोप्राचं पुनरागमन? - प्रियांका चोप्रा सध्या हैदराबादमध्ये आहे आणि तिनं अलीकडेच शहरातील एका मंदिरात दर्शन घेतलं. दरम्यान, बॉलिवूडपासून दूर असलेली प्रियांका चोप्रा आता पुन्हा एकदा तेलुगू चित्रपटसृष्टीत परतत आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की प्रियांका चोप्राने २००५ मध्ये साई रवीच्या 'अपुरूपम' या चित्रपटातून टॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. आता प्रियांका चोप्रा टॉलिवूडमध्ये परतून मोठी धमाल करणार आहे आणि याचे पडसाद बॉलिवूडमध्येही जाणवतील.
एसएसएमबी २९ बद्दल - सध्या चित्रपटाचे नाव निश्चित झालेले नाही. हा एक जंगल साहसी चित्रपट असेल असं म्हटलं जात आहे. राजामौली यांनी या चित्रपटासाठी आफ्रिकन जंगलांची रेकी देखील केली आहे. महेश बाबूच्या भूमिकेबद्दल बोलायचं तर तो बजरंगबलीच्या भूमिकेत दिसू शकतो. सध्या महेश बाबूनंही केस आणि दाढी वाढवली आहे, तर त्याच्या शारीरिक प्रशिक्षणाचे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हा चित्रपट २०२७ मध्ये प्रदर्शित होऊ शकतो.