मुंबई - Pulkit Samrat and Kriti Kharbanda : हिंदी चित्रपटसृष्टीतील सुंदर जोडपे पुलकित सम्राट आणि क्रिती खरबंदा लग्न करून आता मुंबईत परतले आहेत. या जोडप्यानं 15 मार्च रोजी गुरुग्राममधील ग्रँड आयटीसी भारत येथे सात फेरे घेतले असून आता दोघेही मुंबई विमानतळावर स्पॉट झाले आहेत. मुंबई विमानतळावर पोहचल्यानंतर या जोडप्यानं पापाराझीला लग्नाची मिठाई वाटली. लग्नानंतर, या जोडप्याचे सुंदर फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सोशल मीडियावर क्रिती आणि पुलकितला चाहते आणि सेलिब्रिटी लग्नासाठी शुभेच्छा देताना दिसत आहेत. या जोडप्यानं खूप साध्या पद्धतीनं विवाह केला आहे.
पुलकित सम्राट आणि क्रिती खरबंदाचा लूक :मुंबई विमानतळावर पुलकितनं निळ्या रंगाचा कुर्ता आणि पांढऱ्या रंगाचा पायजमा परिधान केला होता, तर क्रितीनं गुलाबी रंगाचा अनारकली सूट घातला होता. यावर तिनं भांगात कुंकु भरलंय. याशिवाय तिनं हातात लाल लग्नाच्या बांगड्या आणि गळ्यात मंगळसूत्र घातले आहे. या जोडप्याच्या चेहऱ्यावर त्यांच्या लग्नाचा आनंद स्पष्ट दिसून येत आहे. याशिवाय 20 मार्च रोजी पुलकित आणि क्रितीनं त्यांच्या मेहंदी सोहळ्याचे फोटो शेअर केले होते. मेहंदी सोहळ्याच्या फोटोंमध्ये, पुलकितनं हिरव्या रंगाचा कुर्ता पायजमा घातला होता आणि क्रिती ऑफ व्हाईट रंगाचा लेहेंगा परिधान केला होता. या जोडप्यानं त्याच्या मेहंदी सोहळ्यात खूप एन्जॉय केल्याचं फोटोवरून दिसत आहे.