मुंबई - कंगना रणौत अभिनीत आणि दिग्दर्शित इमर्जन्सी हा चित्रपट सेन्सॉर सर्टिफिकेट न मिळाल्यानं प्रदर्शित होऊ शकलेला नाही. अनेक कारणांनी प्रदर्शनास विलंब झालेला हा चित्रपट 6 सप्टेंबरला रिलीज होणार होता. परंतु, हा सिनेमा सेन्सॉर बोर्डाकडून सिनेमाच्या रिलीजसाठी प्रमाणपत्र न दिल्यामुळे अडचणीत आला होता. माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांची मुख्य भूमिका साकारण्याबरोबरच चित्रपटाचे दिग्दर्शन आणि सह-निर्मिती करणाऱ्या भाजपा खासदार कंगना रणौत यांनी केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळावर (सीबीएफसी) रिलीजला उशीर करण्यासाठी प्रमाणपत्र थांबवल्याचा आरोप केला होता.
शिरोमणी अकाली दलासह काही शीख संघटनांनी या चित्रपटातील काही दृष्यांवर आक्षेप घेतला होता. शीख समाजाचे चुकीचे चित्रण केल्याचा आणि ऐतिहासिक तथ्ये चुकीची मांडण्यात आल्याचा आरोप झाल्यामुळे कंगना यांचा हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. न्यायमूर्ती बी पी कुलाबावाला आणि फिरदोश पूनीवाला यांच्या खंडपीठानं गेल्या आठवड्यात चित्रपटासाठी प्रमाणपत्र जारी करण्याबाबत निर्णय न घेतल्याबद्दल सीबीएफसीला जोरदार फटकारलं होतं. सेन्सॉर बोर्ड दुहेरी भूमिका घेऊ शकत नाही. त्यांनी ठोस निर्णय घेतला पाहिजे अन्यथा भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य याचा अनादर होईल, असं म्हटलं होतं.
न्यायालयानं सीबीएफसीला 25 सप्टेंबरपर्यंत निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते. चित्रपटाचे सह-निर्माते झी एंटरटेनमेंट एंटरप्रायझेसने कंगना रणौत दिग्दर्शित चित्रपट इमर्जन्सीसाठी सीबीएफसीला प्रमाणपत्र देण्याचे निर्देश द्यावेत या मागणीसाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. गुरुवारी, खंडपीठाने सीबीएफसीला याबाबत काय निर्णय घेतल्याचा जाब विचारला आहे.