मुंबई- Prithviraj Sukumaran : दाक्षिणात्य चित्रपटांनी सवंग लोकप्रिय चित्रपटाबरोबरच वास्तववादी, कलात्मक आणि आशयघन चित्रपटांची कास नेहमीच धरली आहे. मल्याळम, तमिळ, तेलुगू आणि कन्नड भाषेमध्ये असे असंख्य चित्रपट नियमित बनत असतात. 'कांतारा', '2018 : एव्हरी वन इज हिरो', 'सुपर डिलक्स', 'उप्पेना', 'कलर फोटो', 'पेरियरम पेरुमल', 'जय भीम' अशा चित्रपटांनी पुरस्कारासह प्रेक्षकांची मनंही जिंकली आहेत. अलिकडे रिलीज झालेला 'आदुजीविथम- द गोट लाइफ' हा चित्रपट त्याच्या भावनाप्रधान कथानकासाठी आणि उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखला जात आहे. यातील पृथ्वीराज सुकुमारनच्या अभिनयाची तुलना जागतिक स्तरावर केली जात असून त्याला भरपूर प्रशंसा मिळत आहे.
अभिनेता पृथ्वीराज सुकुमारन याच्या अभिनयाचं कौतुक इस्त्रोचे शास्त्रज्ञ आणि पद्मभूषण पुरस्कार विजेते नंबी नारायणन यांनीही केलंय. 'आदुजीविथम- द गोट लाइफ' चित्रपटातील पृथ्वीराजचा अभिनय ऑस्कर पुरस्कारायोग्य असल्याचं त्यांनी म्हटलंय. हा चित्रपट ऑस्कर पुरस्कार मिळवेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केलीय.
इंस्टाग्रामच्या माध्यमातून शास्त्रज्ञ नंबी नारायणन यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात त्यांनी पृथ्वीराज सुकुमारनच्या अभिनयाचं कौतुक करताना म्हटलंय,"हा एक उत्कृष्ट चित्रपट आहे, त्यांनी त्याचं काम अत्यंत चांगलं केलं आहे. मला पृथ्वीराजचा उल्लेख करायलाच हवा. त्यानं या चित्रपटात त्याच्या अभिव्यक्तीनं जीवनाशी जोडलं आहे. सगळा भूतकाळ त्यानं या चित्रपटात मागं टाकलाय. मला खात्री वाटते की या चित्रपटाला ऑस्कर पुरस्कार मिळू शकेल. ऑल द बेस्ट!"