मुंबई - Paresh Mokashi movie : मधुगंधा कुलकर्णी आणि परेश मोकाशी हे जोडी नेहमीच काहीतरी वेगळे घेऊन येण्याच्या प्रयत्नात असते. 'हरीश्चंद्राची फॅक्टरी', 'एलिझाबेथ एकादशी', 'चि व चि सौ कां', 'आत्मपॅम्प्लेट', 'वाळवी' यातून त्यांनी सामाजिक संदेश आणि मनोरंजन याची सांगड घालीत प्रेक्षकांना रिझवले. आता ते ‘नाच गं घुमा’ हा नवीन चित्रपट घेऊन येताहेत. महत्वाचं म्हणजे त्यांच्या 'वाळवी' चित्रपटातील प्रमुख अभिनेता स्वप्नील जोशी देखील या चित्रपटात पुन्हा साथ देत आहे. 'नाच गं घुमा’ चित्रपटाचा स्वप्नील जोशी एक निर्माता असणार आहे. स्वप्नील या चित्रपटाची सहनिर्मिती करीत असून अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतदेखील सहनिर्माती म्हणून या सिनेमासोबत जोडली गेली आहे. ‘नाच गं घुमा’मध्ये मुक्ता बर्वे, नम्रता संभेराव , सुकन्या कुलकर्णी, सुप्रिया पाठारे, सारंग साठे, मधुगंधा कुलकर्णी, शर्मिष्ठा राऊत आणि बालकलाकार मायरा वायकुळ महत्वपूर्ण भूमिकांत दिसतील.
'नाच गं घुमा' चे निर्माते, स्वप्नील जोशी, मधुगंधा कुलकर्णी, परेश मोकाशी, शर्मिष्ठा राऊत, तेजस देसाई आणि तृप्ती पाटील, यांनी एकत्र येत 'हिरण्यगर्भ मनोरंजन’ या निर्मितीसंस्थेची स्थापना केली असून त्या बॅनर खाली या चित्रपटाची निर्मिती झाली आहे. नुकताच या चित्रपटाचा टिझर प्रकाशित करण्यात आला. याचे कथानक महिलांभोवती फिरणारे असून ऑफिसमध्ये कामावर जाणाऱ्या महिला आणि त्यांच्या घरात कामावर येणारी महिला यांच्या नातेसंबंधांवर हा चित्रपट बेतण्यात आला आहे. 'प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक बाई असते आणि प्रत्येक यशस्वी बाईमागे एक कामवली बाई असते' या वाक्याने सुरु होणाऱ्या टीझर मधील “तिसरे महायुद्ध झाले ना, तर ते कामवाल्या बाईंमुळे होईल,” हे वाक्य खूप काही सांगून जाते.