महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

हॅप्पी बर्थडे राजामौली : ईटीव्हीपासून सुरूवात करुन यशाचं शिखर गाठलेला पॅन इंडिया दिग्दर्शक - SS RAJAMOULI BIRTHDAY

आज 10 ऑक्टोबर रोजी पॅन इंडिया चित्रपटाचा निर्माता आणि दिग्दर्शक एसएस राजामौली आपला 50 वा वाढदिवस साजरा करत आहे.

SS Rajamouli
एसएस राजामौली (SS Rajamouli (Getty Images))

By ETV Bharat Entertainment Team

Published : Oct 10, 2024, 7:05 PM IST

मुंबई - 'मगधीरा', 'बाहुबली' आणि 'आरआरआर' सारखे ब्लॉकबस्टर चित्रपट देणारा, भारतातील सर्वात यशस्वी दिग्दर्शकांपैकी एक असलेल्या एसएस राजामौली आज वाढदिवस. हा प्रतिभावान दिग्दर्शक आता पन्नाशीचा झाला आहे. एका टीव्ही सोपसून सुरूवात करुन आज तो देशातील सर्वात यशस्वी दिग्दर्शकांपैकी एक आहे. तेलुगू आणि दक्षिणेतील चित्रपटांना संपूर्ण भारत आणि विदेशात लोकप्रिय बनवण्याचं मोठं श्रेय राजामौलींना जातं. पॅन इंडिया फिल्म्स सुरू करण्याचे श्रेयही राजामौली यांना दिलं जातं. त्याच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याशी संबंधित काही रंजक गोष्टी जाणून घेऊया.

ईटीव्हीपासून झाली करिअरची सुरुवात केली

एसएस राजामौली यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात 'ईटीव्ही तेलुगू' वाहिनीवरील 'शांती निवासम' या मालिकेचे दिग्दर्शक म्हणून केली होती आणि या मालिकेची निर्मिती राघवेंद्र राव यांनी केली होती. त्यानंतर 2001 मध्ये राघवेंद्र यांनी राजामौलीला त्यांच्या प्रोडक्शन बॅनरखाली 'स्टुडंट नंबर 1' चे दिग्दर्शन करण्याची संधी दिली. या चित्रपटात ज्युनियर एनटीआरला कास्ट करण्यात आलं होतं आणि हा चित्रपट हिट ठरला. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही.

राजामौलीच्या कारकिर्दीतील सर्वच चित्रपट ठरले हिट

एसएस राजामौलीचा 'स्टुडंट नंबर 1' हा पहिला चित्रपट 2001 मध्ये प्रदर्शित झाला होता, त्यानंतर राजामौली यांनी एकामागोमाग हिट चित्रपट दिले. त्यानं त्याच्या कारकिर्दीत 12 चित्रपटांचे दिग्दर्शन केलं असून ते सर्व हिट ठरले आहेत. त्याच्या 'मगधीरा' या गाजलेल्या चित्रपटामध्ये राम चरण आणि काजल यांची भूमिका होती, याला समीक्षक आणि प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. हा त्या काळातील सर्वात महागडा तेलुगु चित्रपट ठरला होता आणि 'मगधीरा'ला बॉक्स ऑफिसवर तुफान यश मिळालं होतं. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता.

बाहुबलीने देश-विदेशात मिळवून दिली ओळख

एसएस राजामौलीनं 2015 मध्ये प्रदर्शित केलेल्या 'बाहुबली' चित्रपटानं मोठं यश मिळवलं. प्रभास, राणा दग्गुबती, तमन्ना भाटिया, अनुष्का शेट्टी, रम्या कृष्णन, सत्यराज या कलाकारांनी 'बाहुबली: द बिगिनिंग'मध्ये काम केलं. या चित्रपटापासून पॅन इंडिया चित्रपटांची सुरुवात झाली. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. 2016 मध्ये राजामौलींना पद्मश्रीने सन्मानित करण्यात आलं होतं. यानंतर 'बाहुबली 2: द कन्क्लूजन'ने यशाचे नवे विक्रम रचले. हा चित्रपट 250 कोटींच्या बजेटमध्ये बनवण्यात आला होता. हा चित्रपट 2017 मध्ये प्रदर्शित झाला आणि जगभरात 1810 कोटी रुपये कमावणारा भारतातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. 1000 कोटींचा टप्पा पार करणारा हा पहिला भारतीय चित्रपट ठरला आहे. असं असलं तरी राजामौली यांना अजून एक मोठे यश मिळणे बाकी होते. 2022 मध्ये राम चरण आणि ज्यूनियर एनटीआरच्या 'आरआरआर' चित्रपटानं कमाईचे अनेक रेकॉर्ड तोडले आणि ऑस्कर देखील जिंकला. चित्रपटातील 'नाटू-नाटू' गाण्याला सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याच्या श्रेणीत ऑस्कर पुरस्कार मिळाला होता.

एसएस राजामौलीनं भारतीय चित्रपटसृष्टीला जागतिक स्तरावर एक विशेष ओळख मिळवून दिली आहे. तेलुगु चित्रपटांबरोबरच त्यांनी भारतीय चित्रपटसृष्टीलाही वैभव प्राप्त करून दिलं आहे. त्याचे आगामी चित्रपट नवे आणि मोठे विक्रम प्रस्थापित करतील अशी अपेक्षा आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details