मुंबई - ब्लॉकबस्टर ठरलेल्या 2023 नंतर, 2024 हे वर्ष भारतीय चित्रपट उद्योगासाठी अनेक चढ उतारांचं होतं. वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यात शांतता होती, मात्र दुसऱ्या सहामाहीत कहर झाला. गर्दी खेचणाऱ्या चित्रपटांसह, विशेषत: 'पुष्पा 2: द रुल' आणि 'स्त्री 2' सारख्या चित्रपटांसह बॉक्स-ऑफिसचं नशीब पुन्हा उजळलं. याबरोबरच 'भूल भुलैया ३' आणि 'सिंघम अगेन' हे चित्रपटही बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरले. वर्षाच्या सुरुवातीला 'फायटर', 'शैतान' आणि 'क्रू' सारख्या चित्रपटांनी थोडी कमाई केली आणि 'श्रीकांत', 'मुंज्या', 'आर्टिकल 370', 'मडगाव एक्सप्रेस' यांसारख्या मध्यम बजेटच्या चित्रपटांनी चांगली कमाई केली.
बॉक्स ऑफिस कमाई व्यतिरिक्त मनोरंजन विश्वातील इतर अनेक गोष्टींनी प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं. जिवे मारण्याच्या धमक्या मिळण्यापासून ते घटस्फोटाच्या अफवा आणि अटकेपर्यंत. या वर्षात अशा अनेक घटना घडल्या. 2024 हे वर्ष फिल्मीजगतासाठी पूर्णपणे रोलर कोस्टर राइड होते.
2024 मधील बॉलिवूड ब्लॉकबस्टर चित्रपट
1. स्त्री 2- श्रद्धा कपूर-राजकुमार राव स्टारर 'स्त्री 2' हा चित्रपट स्वातंत्र्यदिनी रिलीज झाला. बॉक्स ऑफिसवर 627.02 कोटींची कमाई करत वर्षातील सर्वात मोठा हिट ठरला. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर कमाईचे अनेक विक्रम मोडले.
2. भूल भुलैया 3- कार्तिक आर्यनच्या हॉरर कॉमेडी 'भूल भुलैया 3' नं बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई केली. विद्या बालन आणि माधुरी दीक्षित यांच्या अभिनयाला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. या चित्रपटानं 278.42 कोटींची कमाई केली होती, तर 'सिंघम अगेन' देखील त्याच्याबरोबर प्रदर्शित झाला होता.
3. सिंघम अगेन- रोहित शेट्टीचा मल्टी-स्टारर चित्रपट 'सिंघम अगेन' देखील बॉक्स ऑफिसवर आपली छाप सोडण्यात यशस्वी ठरला. या चित्रपटानं 268.35 कोटींची कमाई केली.
बॉलिवूडचे सर्वात मोठे फ्लॉप चित्रपट
1. बडे मियाँ छोटे मियाँ - या वर्षातील सर्वात महागड्या चित्रपटांपैकी एक असलेल्या 'बडे मियाँ छोटे मियाँ'मध्ये अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांच्या मुख्य भूमिका होत्या. पण ही स्टार पॉवरचे बॉक्स ऑफिस आकडे वाढवण्यात अपयशी ठरली.
2. जिगरा- आलिया भट्टचा 'जिगरा' हा देखील या वर्षातील सर्वात मोठा फ्लॉप चित्रपट होता. बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये फसवणूक केल्याचा आरोपही या चित्रपटावर होता.
3. सरफिरा- अक्षय कुमारचा 'सरफिरा' हा देखील वर्षातील फ्लॉप चित्रपटांपैकी एक गणला जातो.
दक्षिणेतील ब्लॉकबस्टर चित्रपट
1. 'पुष्पा 2: द रुल'- 2024 हे वर्ष दाक्षिणात्य चित्रपटांसाठी, विशेषतः तेलुगू चित्रपटांसाठी खूप मोठे वर्ष होतं. यापैकी 'पुष्पा 2' नं बॉक्स ऑफिसवर सुनामी आणली. अल्लू अर्जुनचा पुष्पा हा चित्रपट आजही बॉक्स ऑफिसवर अफाट कमाई करत आहे. या चित्रपटानं जगभरात 1750 कोटींचा आकडाही पार केला आहे.
2. कल्की 2898 एडी- प्रभास, दीपिका पदुकोण, अमिताभ बच्चन आणि कमल हासन अभिनीत या साय-फाय चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 294.25 कोटी रुपयांची कमाई केली.
या वर्षी घडलेल्या घटना
चित्रपटांव्यतिरिक्त, बॉलिवूड कलाकार काही नाट्यमय घडामोडींमुळे चर्चेत राहिले. सलमान खानला मिळालेली जीवे मारण्याची धमकी आणि कंगना राणौतला थप्पड मारण्यापासून ते ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चनचे कथित विभक्त होत असल्यांच्या अफवा आणि अल्लू अर्जुनची धक्कादायक अटक अशी चर्चा सातत्यानं होत राहिली आहे.
1. कंगना रणौतला थप्पड मारण्याची घटना - जूनमध्ये, भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर मंडी इथून लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर, कंगना रणौत नवी दिल्लीला जात असताना चंदीगड विमानतळावर CISF महिला जवानानं तिला थप्पड मारली. तिच्या वादग्रस्त विधानासाठी तिला ही थप्पड मारण्यात आली होती. यानंतर थप्पड मारणारी महिला कुलविंदर कौरविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला. या घटनेमुळे माध्यमांमध्ये खळबळ माजली आणि शेवटी त्या महिला जवानला निलंबीत करण्यात आले.
2. सलमान खान आणि शाहरुख खानला धमकी- तुरुंगात बंद गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईबरोबरचा सलमान खानचा दीर्घकाळ चाललेला वाद यावर्षी पुन्हा वाढला. काळवीट पवित्र मानणाऱ्या बिश्नोई यानं 1998 च्या शिकार प्रकरणाचा बदला घेण्याची धमकी दिली. या वर्षाच्या सुरुवातीला सलमानच्या निवासस्थानाबाहेर गोळीबाराची घटना घडली होती, त्यानंतर त्यांची सुरक्षा वाढवण्यात आली होती. नोव्हेंबरमध्ये शाहरुख खानलाही धमकावून ५० लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. मात्र आरोपीला अटक करण्यात आली.
3. मल्याळम चित्रपट उद्योगात 'मी टू चळवळ' - हेमा समितीच्या अहवालानं मल्याळम उद्योगात खळबळ उडवून दिली. हा अहवाल मल्याळम फिल्म इंडस्ट्रीमधील लैंगिक छळाच्या प्रकरणांची चौकशी करण्यासाठी आणि सोडवण्यासाठी तयार करण्यात आला होता ज्यामध्ये अनेक मोठी नावं पुढे आली आणि ही बातमी मोठी खळबळजनक बनली.
4. विक्रांत मॅसीची निवृत्ती- डिसेंबरमध्ये, विक्रांत मॅसीने इन्स्टाग्राम पोस्टद्वारे निवृत्तीची घोषणा करून सर्वांना आश्चर्यचकित केले. परंतु नंतर त्यानं स्पष्ट केले की तो कुटुंब आणि आरोग्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी तात्पुरती विश्रांती घेत आहे.
5. नयनतारा-धनुषची कायदेशीर लढाई - दक्षिण अभिनेत्री नयनताराने एका खुल्या पत्रानं वाद निर्माण केला, ज्यामध्ये तिनं डिसेंबरमध्ये चित्रपट निर्माता आणि अभिनेता धनुष यांच्या कृत्याबद्दल खटला दाखल केला होता.
6. पूनम पांडेच्या मृत्यूची अफवा - फेब्रुवारी महिन्याची सुरुवात पूनम पांडेच्या मृत्यूच्या बातमीनं झाली. पूनम पांडेच्या इन्स्टाग्रामवरील पोस्टमध्ये गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगामुळे तिचा 'मृत्यू' जाहीर करण्यात आलं होतं. सोशल मीडियावर शोककळा पसरली होती पण काही दिवसांनंतर तिनं लाइव्ह सेशनमध्ये हजेरी लावून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. तिनं सांगितले की ती पूर्णपणे बरी आणि जिवंत आहे. हा स्टंट करण्यामागील उद्देश गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाबाबत जागरूकता वाढवण्याचा असल्याचा दावा पूनमनं केला होता. मात्र, काही लोकांना त्याची ही पद्धत आवडली नाही.
7. अल्लू अर्जुनला अटक - अल्लू अर्जुनचा चित्रपट 'पुष्पा 2: द रुल' यशस्वी झाल्यानंतर काही दिवसांनी डिसेंबरमध्ये अल्लू अर्जुनला चित्रपटाच्या प्रीमियरच्या वेळी एका महिलेच्या मृत्यूप्रकरणी हैदराबाद पोलिसांनी अटक केली होती. महिलेच्या कुटुंबीयांनी गुन्हा दाखल केल्यानंतर अर्जुनला अटक करण्यात आली होती. तेलंगणा उच्च न्यायालयानं अंतरिम जामीन मंजूर केल्यानंतर त्याची सुटका करण्यात आली. अटकेनंतर राजकीय वाद सुरू झाला आणि विरोधकांनी तेलंगणा सरकारवर अल्लू अर्जुनचा छळ केल्याचा आरोप केला.
8. अनंत अंबानी-राधिका मर्चंटचं लग्न - या वर्षी राधिका आणि अनंतच्या लग्नाचीही जोरदार चर्चा झाली. यामध्ये बॉलिवूड, हॉलिवूडसह जगभरातील विविध क्षेत्रातील सेलेब्रिटींनी हजेरी लावली. अनंत-राधिकाचे लग्न १२ जुलैला, शुभ आशीर्वाद सोहळा १३ जुलैला आणि भव्य रिसेप्शन १४ जुलैला झाले.
घटस्फोट आणि घटस्फोटाच्या अफवा
1. ऐश्वर्या राय-अभिषेक बच्चन
या वर्षात जर कोणते जोडपे सर्वाधिक चर्चेत आले तर ते म्हणजे ऐश्वर्या आणि अभिषेक. जुलैमध्ये अनंत अंबानींच्या लग्नादरम्यान त्यांच्या नात्यात अडचणी निर्माण झाल्याची चर्चा सुरू झाली होती. ऐश्वर्या आणि तिची मुलगी आराध्या या लग्नाला स्वतंत्रपणे पोहोचल्या होत्या, तर अमिताभ बच्चन, जया बच्चन, अभिषेक, श्वेता, अगस्त्य नंदा आणि नव्या नवेली यांच्यासह बच्चन कुटुंबातील इतर सदस्यांनी स्वतंत्रपणे हजेरी लावली होती.
जेव्हा अभिषेक आणि बच्चन कुटुंब ऐश्वर्याला तिच्या वाढदिवसाच्या जाहीर शुभेच्छा देण्यासाठी पुढं आला नाही किंवा सोशल मीडियावर तिला शुभेच्छाही दिल्या नाहीत तेव्हा या अफवांना आणखी बळ मिळालं.
मात्र, या अफवांवर दोन्ही बाजूंकडून अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही.
2. एआर रहमान-सायरा बानो यांचा घटस्फोट
एआर रहमानने २९ वर्षांच्या लग्नानंतर पत्नी सायरा बानोपासून विभक्त झाल्याची घोषणा करून सर्वांना आश्चर्यचकित केलं. जोडप्यानं संयुक्त निवेदनात त्यांच्या गोपनीयतेची विनंती केली.
या सर्व घटनांसह आपण 2024 चा निरोप घेत आहोत आणि 2025 ची आशा करतो आहोत. चित्रपटसृष्टीत सर्व काही सुरळीत ठेवणं अवघड असलं तरी जग हे आशेवर उभं असतं असे म्हणतात. म्हणूनच आम्ही आशा करतो की पुढच्या वर्षी अधिकाधिक चित्रपट हिट होतील, आम्हाला मोठ्या पडद्यावर चांगल्या कथा पाहायला मिळतील.