मुंबई : पाश्चात्य रुढीनुसार, मंगळवार 31 डिसेंबर हा वर्षातील शेवटचा दिवस आहे. सन् 2024 ला निरोप देण्यासाठी मुंबईकर सज्ज झाले आहेत. नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला जुन्याला निरोप देण्याबरोबर येणाऱ्या नव्याचं स्वागत करण्यासाठी मुंबईकरांची हक्काचे सेलिब्रेशन स्पॉटस् ठरलेले आहेत. समुद्रकिनारा तर मुंबईचं वैशिष्ट्य आणि मुंबईबाहेरच्या लोकांच्या आकर्षणाचा विषय! यात मुंबईतील मरीन ड्राईव्ह, गिरगाव चौपाटी, जुहू चौपाटी शिवाय देशाचं प्रवेशद्वार म्हणजे गेट वे ऑफ इंडिया परिसर लोकांनी फुलून गेलेला असतो.
मुंबईतील सायलेंट बीच (Silent Beach) : समुद्र किनाऱ्यावर वेळ व्यतीत करायला आवडणाऱ्या अनेकांची गाडी मुंबईतील मरीन ड्राइव्ह, गिरगाव चौपाटी, जुहू चौपाटी, बॅण्ड स्टँड पलीकडे जातच नाही. अर्थात न्यू ईअर सेलिब्रेशनसाठीसुद्धा ही मंडळी याच समुद्र किनाऱ्यांची निवड करतात. ज्यांना समुद्राच्या लाटा भुरळ घालतात, ज्यांना समुद्राच्या लाटा पायावर झेलायला आवडतात, ज्यांना वाळूत बसून भविष्याची स्वप्नं रंगवायला आवडतात त्यांच्यासाठी न्यू ईअर सेलिब्रेट करण्यासाठी मुंबईतच उत्तम पर्याय आहेत. वर उल्लेखलेल्या समुद्र किनाऱ्यांसह आक्सा बीच, दानापानी हे समुद्र किनारेसुद्धा सदैव गजबजलेले असतात. पण ज्यांना समुद्राची मोहिनी पडते आणि प्रियजनांबरोबर निवांत वेळही घालवायचा आहे, त्यांच्यासाठी आम्ही मुंबईतील काही सायलेन्ट बीच आम्ही सुचवत आहोत. पाहा. सरत्या वर्षाला निरोप देताना आणि नवीन वर्षाचं स्वागत करताना यातल्या एखाद्या बीचवर जाण्याची संधी मिळत असेल तर...
वर्सोवा बीच : मुंबईतील गिरगाव, जुहू किंवा मरीन ड्राईव्ह समुद्रकिनाऱ्यांच्या तुलनेत वर्सोवा समुद्रकिनाऱ्यांवर फारशी गजबज नसते. हा समुद्रकिनारा जूहू चौपाटीपासून जवळ आहे. येथे तुम्ही अंधेरी स्टेशनपासून किंवा विलेपार्ले स्टेशनपासून बेस्ट बसने किंवा रिक्षाने अगदी काही मिनिटांत पोहोचू शकता. मेट्रो ट्रेनचाही पर्याय आहेच. मेट्रो ट्रेनने गेल्यास वर्सोवा मेट्रो स्टेशनवरून अगदी मोजक्या वेळेत हा समुद्र किनारा गाठता येऊ शकतो. शांत आणि निवांतपणे सेलिब्रेशन करण्यासाठी काही वर्सोवा बीचचा पर्याय निवडतात.
माहीम चौपाटी : माहीम समुद्र किनाऱ्यावरही लोकांची जास्त वर्दळ नसते. या समुद्रकिनारी जाण्यासाठी माहीम रेल्वे स्थानकातून बसने किंवा टॅक्सीने जाऊ शकता. पायी जायचं असेल तर अंतर वीस ते पंचवीस मिनिटांचं आहे. माहीम समुद्रकिनाऱ्यावरून वरळीपर्यंत आणि बांद्रापर्यंतचा सर्व समुद्रकिनाऱ्यालगतचा परिसर दिसतो. तसेच इथून वरळी सी-लिंकचंही विहंगम दृश्य न्याहाळता येतं. इथे गर्दी नसल्यामुळे मुंबईकर या माहीम चौपाटी सेलिब्रेशनसाठी डेस्टिनेशन निवडू शकता.
गोराई बीच : गोराई बीच बोरिवली पश्चिम परिसरात आहे. बीचच्या सभोवताली नारळी आणि पोफळीची झाडे आहेत. इथलं वातावरण निसर्गरम्य आहे. मुंबईत अभावाने आढळणारा गारठा आणि निवांतपणा दोन्ही इथे अनुभवता येतात. इथे तुम्ही बोरिवली रेल्वे स्टेशनपासून रिक्षा, बस किंवा टॅक्सीने तुम्ही पोहोचू शकता. इथला परिसर अतिशय विलोभनीय आहे. विशेष म्हणजे इथे पर्यटकांची फार गर्दी दिसत नाही. इथे आपल्या मित्र-मैत्रीण किंवा सुह्रदांच्या साथीने सेलिब्रेशन करण्याचा उत्तम पर्याय आहे. विशेष म्हणजे इथल्या वाळूत शांतपणे बसून सूर्यास्त पाहणं हा एक उत्कट अनुभव असतो. अनेकजण फक्त सूर्यास्ताचा क्षण डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी गोराई बीचचा पर्याय निवडतात.
मारवे बीच : रेल्वेने प्रवास करत असाल तर पश्चिम उपनगरातल्या मालाड स्टेशनला उतरलात की, मारवे बीचच्या दिशेने जाण्यासाठी तुम्हाला रिक्षा मिळतील. मुख्य शहरापासून बऱ्यापैकी दूर असल्याने इथेही लोकांची फारशी गर्दी नसते. मुंबईत अभावाने दिसणारा निसर्ग इथे तुम्हाला प्रफुल्लित करतो. त्यामुळं तुम्ही निवांतपणे या ठिकाणी वेळ घालवू शकता. ईयर एन्डींग सेलेब्रिशनसाठी मारवे बीच हा एक अतिशय चांगला पर्याय ठरु शकतो.
मढ बीच : बहुसंख्य चित्रपट, मालिकांच्या चित्रीकरणासाठी मढ परिसर प्रसिद्ध आहे. इथला समुद्रकिनारा अतिशय शांत आणि सुंदर आहे. तुम्हाला निवांतपणे वेळ घालवण्यासाठी हा समुद्रकिनारा चांगला आहे. फेसाळणाऱ्या लाटा, समुद्राची गाज! बस एवढाच काय तो आवाज. मढ हे मुंबईतील लहानसं बेट आहे. या समुद्रकिनारी पर्यटकांची गर्दी पाहायला मिळत नाही. त्यामुळं जर तुम्ही ईयर एन्डींग सेलिब्रेशनसाठी कोणत्या बीचवर जायचं असेल तर मढ बीचचा प्लॅन नक्की करू शकता.
मनोरी समुद्रकिनारा : मनोरी समुद्रकिनाऱ्याला जाण्यासाठी मालाड रेल्वे स्टेशनला उतरावं लागेल. मालाड रेल्वे स्टेशनपासून रिक्षाने काही मिनिटांच्या अंतरावर मनोरी किनारा आहे. शहरातल्या कोलाहलातून मुक्तता हवी असेल तर एकदा मनोरी समुद्रकिनाऱ्यावर याच. इथलं वातावरण तुम्हाला काही क्षण तुमचे ताण विसरायला लावतो. त्यामुळं जर तुम्ही एअर एंडिंग सेलिब्रेशन कुठल्या समुद्रकिनारी करण्याचं प्लॅनिंग करत असाल, तर मनोरी समुद्रकिनारा अतिशय चांगला पर्याय ठरू शकतो.
कार्टर रोड : कार्टर रोड समुद्रकिनारा हा मुंबईच्या वांद्रे परिसरात येतो. इथे तुम्ही बेस्ट बस किंवा खाजगी वाहनाने माफक दरात पोहोचू शकता. या समुद्रकिनाराच्या आसपास कोळी बांधवांच्या वसाहती आहेत. तसेच आजूबाजूला मोठे बांधकाम आणि कठडे बांधण्यात आले आहेत. समुद्रकिनारी बसून समुद्राच्या फेसळणाऱ्या लाटांचा निवांतपणे अनुभव घेऊ शकता. इथे सूर्यास्त अनुभवणं हाही भन्नाट अनुभव आहे. हा मुंबईतल्या छुप्या आणि शांत समुद्र किनाऱ्यांपैकी मानला जातो. याव्यतिरिक्त वसई, नालासोपारा आणि विरारमधील अनेक बीचेच आहेत, जिथे तुम्ही शांत आणि निवांतपणे सेलिब्रेशन करु शकता.
काय मग. विचार कसला करताय? सरत्या पाश्यात्य वर्षाला निरोप देण्यासाठी डेस्टिनेशन ठरवायचं असेल तर यातला एखादा पर्याय निवडा आणि पाश्चात्य नवीन वर्षाची सुरुवात नव्या ऊर्जेने करा.
हेही वाचा -