कोल्हापूर : मटणाच्या हौशी खवय्यांसाठी ओळखले जाणारे शहर म्हणजे 'कोल्हापूर' होय. झणझणीत तांबडा-पांढरा रस्सा आणि लुसलुशीत मटण खाल्ल्याशिवाय अनेक कोल्हापूरकरांचा आठवडा पूर्ण होत नाही. त्यातच आता 31 डिसेंबर अवघ्या काही तासांवर येऊन ठेपल्यामुळं कोल्हापुरातील हौशी मंडळी पार्ट्यांच्या नियोजनात रमली आहेत. जगप्रसिद्ध असलेल्या कोल्हापूरच्या तांबडा-पांढऱ्या रस्स्यासोबतच आता मटण आणि चिकन लोणच्याला (Mutton Pickle) चांगली मागणी वाढलीय. कोल्हापुरातील मोश्मी आणि विक्रांत पोवार या दाम्पत्याकडून बनवले जाणारे मटणाचे लोणचे आता साता समुद्रापार पोहोचले आहे. सरत्या वर्षाला निरोप देताना होणाऱ्या जंगी पार्ट्यांमध्ये चिकन आणि मटणाच्या लोणच्याची भुरळ सर्वांनाच पडली आहे.
विदेशातही मिळणार कोल्हापुरी मटणाचं लोणचं : कोल्हापुरातील बिंदू चौकात राहणाऱ्या मोश्मी आणि विक्रांत पोवार यांच्या मित्र परिवारासाठी आठवड्यातून किमान चारवेळा मटण चिकनच्या हौशी खवय्यांसाठी पार्टी ठरलेली असायची. मात्र जिभेवर रेंगाळणारी चव कायम राहावी, यासाठी अस्सल मटण आणि चिकनपासून बनवलेलं लोणचं बनवण्याची सुरुवात पाच वर्षांपूर्वी या दाम्पत्यांनी केली. आता पोवार यांनी बनवलेलं लोणचं साता समुद्रापार पोहोचलं आहे. कोल्हापुरातून जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेल्या हौशी मटण खवय्ये मटणाचं लोणचं सोबत घेऊनच जातात. तीन महिने टिकणारं अस्सल कोल्हापूरच्या मातीत तयार झालेलं लोणचं विदेशातही खायला मिळत असल्यामुळं जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेल्या कोल्हापूरकरांना पोवार यांच्या मटण लोणच्याची भुरळ पडली आहे.
दिवसाला किमान पाच किलो लोणच्याची ऑर्डर : कोल्हापूरच्या खाद्यसंस्कृतीला साजेल असंच 'मटण लोणच' पोवार दाम्पत्य घरगुती मसाले वापरून तयार करतात. दिवसाला किमान पाच किलो मटणापासून लोणचं बनवण्याची ऑर्डर पोवार यांच्याकडं असते. यातूनच ते वर्षभरात किमान चार ते पाच लाखांची उलाढाल करतात, अशी प्रतिक्रिया विक्रांत पोवार यांनी दिली.
मटण आणि चिकनच्या मागणीत वाढ : कोल्हापूर जिल्ह्यातून नोकरी आणि व्यवसायानिमित्त हजारो कोल्हापूरकर देशाच्या कानाकोपऱ्यात स्थायिक झाले आहेत. सुट्ट्यांमध्ये घरी आल्यानंतर जाताना सोबत ते मटण आणि चिकनचे लोणचं घेऊनच कोल्हापूरला निरोप देतात. यासोबतच कोल्हापुरातून परदेशात येणाऱ्या कुटुंबीयांनाही येताना लोणचं घेऊनच येण्याचा हट्टहासही अनेक कोल्हापूरकर करतात. विदेशातील अमेरिका, दुबई, बेल्जियम, लंडन या देशात जिभेवर रेंगाळणाऱ्या चवीच लोणचं पोहोचलं आहे. आता सरत्या वर्षाला निरोप देताना मटण आणि चिकनच्या मागणीत वाढ झाल्याचं हे मोश्मी पोवार यांनी सांगितलं.
हेही वाचा -