मुंबई- Best Movies to Watch on Women's Day : चित्रपट जगतात महिलांचे अनुभव आणि आकांक्षा हा विषय अनेकवेळा केंद्रस्थानी राहिला आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आपल्या वॉचलिस्टमध्ये समावेश होऊ शकतील अशा काही खास चित्रपटाची माहिती घेऊयात. हे चित्रपट सर्व स्तरातील भारतीय महिलांचे जीवन दर्शन घडवतात आणि पितृसत्ताकतेवरचे सामाजिक भाष्य करतात.
1. लापता लेडीज: अलिकडेच रिलीज झालेला किरण राव दिग्दर्शित, हा चित्रपट पारंपारिक पदर घेण्याच्या पद्धतींशी संबंधित सामाजिक आव्हानांवर मार्मिक भाष्य करतो. ही कथा जया आणि फूल या दोन नवविवाहित स्त्रींची आहे. रेल्वे प्रवासादरम्यान आलेल्या अनुभवानंतर पुरुष हे आपल्या संरक्षणासाठी असतात अशा संस्कारात वाढलेल्या या महिला एका अनोळख्या विश्वात पोहोचतात. हा चित्रपट सध्या चित्रपटगृहांमध्ये सुरू आहे.
2. द ग्रेट इंडियन किचन: हा समीक्षक आणि प्रेक्षकांनी गौरवलेला मल्याळम भाषेतील सुंदर चित्रपट आहे. समाज, नातेवाईक, आणि विवाह संस्थांमधील लैंगिक गतिमानतेचा अभ्यास करत स्त्रियांच्या जीवनावर नियंत्रण ठेवणाऱ्या जाचक पितृसत्ताक नियमांवर प्रकाश टाकतो. लग्नानंतरच्या पतीच्या कौटुंबिक जाचक अपेक्षांशी जुळवून घेत असलेल्या तरुणीच्या अनुभवातून हा चित्रपट सामाजिक चौकटीला आव्हान देतो आणि स्त्री म्हणून असलेल्या ओळखीच्या गुंत्याचा शोध घेतो. सध्या ' द ग्रेट इंडियन किचन' हा चित्रपट सबटायटल्ससह अमेझॉन प्राईमवर स्ट्रिमिंग होत आहे.
3. भक्षक : वैशाली सिंग या खंबीर शोध पत्रकाराने तिच्या वैयक्तिक संकटातही सत्याच्या शोधासाठी केलेल्या संघर्षाची ही अनोखी कथा आहे. मुलींच्या निवारागृहातील चोरीचा तपास करताना तिला एक विदारक सत्य दिसते. त्या मुलींना न्याय मिळवून देण्यासाठी ती आपल्या सहकाऱ्यांना एकत्र आणते. 'भक्षक'मधील वैशालीचा हा अविचल दृढनिश्चय आणि सत्याचा उलगडा करण्याची, स्त्रियांना अन्यायाचा सामना करण्यासाठी आणि अर्थपूर्ण बदल घडवून आणण्यासाठी सक्षम बनवण्यासाठी चाललेली धडपड मनोरंजनाबरोबरच डोळ्यांत अंजन घालण्याचे काम करतो. हा चित्रपट सध्या नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे.