मुंबई - दिग्दर्शक अनिल शर्मा हे नाव 'गदर 2' मुळं हायलाईट झालं. या चित्रपटानं तुफान गल्ला कमवल्यामुळं त्याच्या आगामी 'वनवास' चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनकडं सिने विश्लेषकांचं बारीक लक्ष होतं. परंतु नाना पाटेकर, उत्कर्ष शर्मा आणि सिमरत कौर सारख्या तगडा कलाकारांची फौज असतानाही या चित्रपटाला पहिल्या दिवशी अपेक्षित यश मिळालेलं नाही. कौटुंबीक नाट्य असलेल्या 'वनवास'च्या कथानकावर, पार्श्वसंगीत आणि छायांकनावर प्रेक्षक खूश झाले असले तरी तिकीट बारीवर प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याचं चित्र पहिल्या दिवशी पाहायला मिळालं.
अनिल शर्मा दिग्दर्शित 'वनवास' चित्रपटाची पहिल्याच दिवशी सुरुवात निराशाजनक सुरूवात झालीय. बॉक्स ऑफिसवर 'पुष्पा २ : द रुल' आणि 'मुसाफा : द लायन किंग' या दोन चित्रपटांचा सामना या चित्रपटाला करावा लागतोय. हे दोन्ही चित्रपट 'वनवास'वर भारी पडताना दिसत असून आगामी काळात 'बेबी जॉन'सारखे चित्रपट रिलीज होणार असल्यामुळे आज शनिवारी आणि उद्या रविवारी चित्रपटाला यश मिळणं आवश्यक आहे.
अपेक्षेप्रमाणे 'पुष्पा 2' आणि 'मुफासा'ने बॉक्सऑफिसवर वर्चस्व गाजवले आणि प्रेक्षकांच्या संख्येत लक्षणीय वाटा मिळवला. 'वनवास'ला नशीब बदलून टाकण्यासाठी केवळ माऊथ पब्लिसीटवर अवलंबून राहणं परवडणारं नाही. अन्यथा, पुढचा प्रवास खडतर असेल, विशेषत: 'बेबी जॉन' हा चित्रपट आठवड्याच्या मध्यात म्हणजे बुधवारी येणार आहे. 'वनवास'नं आठवड्याच्या सुरुवातीला पहिल्या दिवशी 73 लाखाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन केल्याचं, फिल्म इंडस्ट्रीचे विश्लेषक तरण आदर्श यांनी म्हटलंय.
सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, 'वनवास'नं भारतात 60 लाखाची कमाई केली आहे. या चित्रपटाची जगभरातील कमाई 72 लाख आहे. त्यामुळं पहिल्या दिवशी या चित्रपटाला 1 कोटीचा आकडा पार करता आलेला नाही. पहिल्या दिवशीची ही प्ररंभिक कमाईची आकडेवारी असल्याचं सांगितलं जातंय.
बाप लेकाच्या नात्यावर आधारित असलेल्या 'वनवास' चित्रपटातून अनिल शर्मा यांनी एक कौटुंबीक कथानक प्रेक्षकांसमोर मांडलंय. चित्रपट प्रेक्षकासमोर वेगळी कथा सांगत असला तरीही 'पुष्पा 2' सारख्या अॅक्शन चित्रपटांसमोर बिथरल्याचं चित्र बॉक्स ऑफिस कलेक्शनवरुन दिसतंय.