मुंबई - Yek Number marathi Movie : तेजस्विनी पंडित एका चित्रपटाच्या सेटवर उभी आहे. तिच्यासमोर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या व्यक्तिमत्वाशी साधर्म्य असलेली व्यक्ती उभी आहे. हा फोटो सोशल मिडियावर कमालीचा व्हायरल झाला होता. त्यातून अभिनेत्री तेजस्विनी पंडित ही राज ठाकरे यांचा बायोपिक घेऊन चित्रपटरसिकांच्या भेटीला येतेय, अशी जोरदार चर्चा झाली. अखेर चित्रपटाची सहनिर्माती असलेल्या तेजस्विनीनेच या चर्चेला अल्पविराम देत आपल्या नव्या चित्रपटाचं दुसरं पोस्टर रिलीज केलं आहे. झी स्टुडिओज् आणि नाडियाडवाला ग्रँडसन एंटरटेनमेंट प्रस्तुत, सह्याद्री फिल्म्स निर्मित, राष्ट्रीय पुरस्कार विजेते राजेश मापुस्कर दिग्दर्शित 'येक नंबर' येत्या 10 ऑक्टोबर रोजी दसऱ्याचे औचित्य साधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरमध्ये चित्रपटसृष्टीत नवा अभिनेता पदार्पण करत असल्याचे संकेत मिळाले होते. प्रेक्षकांना या पोस्टरमधील तरुण कोण, हे जाणून घेण्याची प्रचंड इच्छा होती. तर आता या गोष्टीवरून पडदा उठला असून हा रांगड्या व्यक्तिमत्वाचा तरुण धैर्य घोलप असल्याचं समोर आलं आहे. विशेष म्हणजे या पोस्टरमध्ये नायकाच्या बॅकड्रॉपला राज ठाकरे यांच्याशी मिळती चेहरेपट्टी असलेल्या व्यक्तीचे डोळे दाखवण्यात आल्यामुळे राज ठाकरे यांचा या चित्रपटावर प्रभाव असल्याचा अंदाज प्रेक्षकांना आला आहे.
'येक नंबर' चित्रपटाबद्दल : नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये नवा अभिनेता धैर्य घोलपचा 'अँग्री लूक' पहायला मिळतो. यापूर्वी रिलीज झालेल्या पोस्टरमध्ये धैर्यनं परिधान केलेल्या जॅकेटवर 'मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा' असं लिहिलेलं होतं. त्याच्या हातात एक बाटली आणि खिशात एका मुलीचा फोटो देखील दिसत होता. हे पोस्टर खूप धमाकेदार असून यात एक वेगळेपणा दिसत होता. तेजस्विनी पंडित आणि वरदा साजिद नाडियाडवाला हे 'येक नंबर' चित्रपटाच्या निर्माते आहेत. याशिवाय चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शनाची धुरा अजय -अतुल यांनी सांभाळली आहे. 'येक नंबर' चित्रपटाच्या छायाचित्रणाची धुरा संजय मेमाणे यांनी सांभाळली आहे.
तेजस्विनी पंडितनं चित्रपटाबद्दल केलं मत व्यक्त : चित्रपटाबद्दल दिग्दर्शक राजेश मापुस्कर यांनी सांगितलं, "या चित्रपटासाठी मला एक असा नवीन चेहरा हवा होता, जो प्रेक्षकांना आपल्यातलाच एक वाटेल. त्यामुळे धैर्यचा रांगडा लूक मला या व्यक्तिरेखेसाठी अतिशय योग्य वाटला. त्यानेही या व्यक्तिरेखेला उत्तम न्याय दिला आहे.'' तेजस्विनी पंडितनं या चित्रपटाबाबत माहिती दिली की, ''प्रेक्षकांची अनेकदा तक्रार असते की, मराठी चित्रपटांमध्ये तांत्रिकदृष्ट्या, सादरीकरणात भव्यता नसते. हाच समज दूर करण्याचा आमचा प्रयत्न आहे. या चित्रपटात अनेक कुशल, सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञांचा सहभाग आहे. या चित्रपटामधील भव्यता प्रेक्षकांना पडद्यावर नक्कीच दिसेल.''