कोल्हापूर Ayush ulgadde Interview :मराठमोळा दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांच्या "मुंज्या" या हिंदी चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 100 कोटींपेक्षा जास्त गल्ला जमवला आहे. या चित्रपटातील मुख्य भूमिकेत असलेला बालकलाकार आयुष उलगड्डे हा मूळचा कोल्हापूरचा आहे. या बालकलाकारानं अप्रतिम अभिनय करत सर्वांचंचं लक्ष वेधून घेतलं. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्यांदाच कोल्हापुरात आलेल्या आयुषनं 'ईटीव्ही भारत' ला खास मुलाखत दिली. या चित्रपटातील चित्रीकरणावेळीचे अनुभव त्यानं सांगितले. तसंच कोल्हापूरकरांनी दाखवलेलं प्रेम विसरू शकत नाही, अशा भावनाही त्यानं व्यक्त केल्या.
आयुषनं 'या' मालिकांमध्ये केलंय काम : 7 जून रोजी प्रदर्शित झालेल्या "मुंज्या" या चित्रपटात बालकलाकार म्हणून भूमिका साकारलेला कोल्हापूरचा बालकलाकार आयुष उलगड्डे यानं आपला प्रवास उलगडला. कोल्हापुरातील उंचगाव इथं आई-वडिलांसोबत राहणाऱ्या आयुषनं कोल्हापुरातीलच शिंदे थिएटर अकॅडमीत अभिनयाचे धडे गिरविले. राजा राणीची गं जोडी, 'ढ' लेकाचा, संत गजानन शेगावीचे, दख्खनचा राजा ज्योतिबा अशा मालिकेतून तो मराठी प्रेक्षकांसमोर आला. त्याच्या अभिनयाचं कौतुकही झालं. आदित्य सरपोतदार दिग्दर्शित पहिल्या हिंदी चित्रपटात मुख्य बालकलाकाराच्या ऑडिशनपासून चित्रीकरणापर्यंतचा प्रवास रंजक असल्याचं आयुषनं 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितलं. "घरात कोणतीही अभिनयाची पार्श्वभूमी नव्हती. मला इतक्या मोठ्या कलाकारांसोबत काम करायला मिळालं. पावनखिंड चित्रपटात बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका साकारणारे अभिनेते अजय पुरकर यांना सेटवर पाहून पहिल्यांदा मला अश्रू अनावर झाले," अशा भावना आयुषनं व्यक्त केल्या. "मुंज्या" चित्रपटातील भूमिकेमुळं कोल्हापूरवासियांना आणि माझ्या मित्रांना खूप आनंद झाल्याचं यावेळी आयुषनं सांगितलं.