मुंबई - अभिनेत्री म्हणून अनन्या पांडे आज हिंदी चित्रपट सृष्टीत स्थिरावत चालली आहे. आपल्या अभिनयाच्या आणि देखण्या सौंदर्याच्या जीवावर तिनं आपला एक चाहता वर्ग तयार केला आहे. 2019 मध्ये 'स्टुडंट ऑफ द इयर 2' या टीन एजर चित्रपटातून तिनं अभिनयात पदार्पण केलं होतं. तेव्हापासून, स्टार किड कॅमिओ वगळता आठ चित्रपटांमध्ये ती दिसली आहे. बॉलीवूड अभिनेता चंकी पांडे आणि उद्योजिका भावना पांडे यांची मुलगी असलेल्या अनन्यानं 'स्टार किड' लेबलसह इंडस्ट्रीत प्रवेश केला. फिल्मी पार्श्वभूमी असलेल्या घराण्यातून आली असली तरी तिनं आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
एक अभिनेत्री म्हणून जवळपास सहा वर्षांत, अनन्यानं वेगवेगळ्या भूमिकातून आपलं अष्टपैलुत्व दाखवलं आहे. 'स्टुडंट ऑफ द इयर 2' या रोमँटिक ड्रामापासून सुरुवात करून, तिनं 'पती पत्नी और वो' आणि 'ड्रीम गर्ल 2' यांसारख्या विनोदी चित्रपटातून भूमिका केल्या आहेत. तिनं विजय देवरकोंडाच्या बरोबर 'लायगर' या पॅन इंडिया चित्रपटातही आपली कमाल दाखवली होती. त्यानंतर तिनं शकुन बत्राच्या 'गेहराइयाँ' या रिलेशनशिप ड्रामा चित्रपटामध्ये तिनं दीपिका पदुकोण आणि सिद्धांत चतुर्वेदी या कलाकारांसह आपली उपस्थिती दर्शवली होती.
विशेष म्हणजे, 'गेहराइयाँ'पासून अनन्याच्या चित्रपट निवडींमध्ये लक्षणीय बदल झाल्याचं दिसून आलं आहे. अवघ्या 25 व्या वर्षी, तिने असे चित्रपट निवडण्यास सुरुवात केली आहे. त्यानंतर 'खो गए हम कहाँ' ते 'कॉल मी बे' आणि आता 'CTRL' पर्यंतचे चित्रपट तिच्या प्रतिभेची चुणूक दाखवतात. हे सर्व प्रोजेक्ट ओटीटी रिलीज आहेत, त्यामुळे तिला बॉक्स ऑफिस कामगिरीचा दबाव नसल्यामुळे अभिनयात प्रयोग करण्यासाठी अधिक स्वातंत्र्य मिळालं असावं.
एका वर्षापेक्षा कमी कालावधीत, अनन्यानं 'कॉल मी बे' या इशिता मोईत्रा द्वारे निर्मित आणि कॉलिन डी’कुन्हा दिग्दर्शित कॉमेडी मालिकेत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. यामध्ये तिनं बेला चौधरीची भूमिका केली आहे. अनन्याला तिच्या अलीकडच्या रिलीज झालेल्या 'सीटीआरएल' ( CTRL ) मधील भूमिकेसाठी सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे, हा एक आकर्षक चित्रपट आहे जो AI च्या युगात डेटा गोपनीयतेचा अभ्यास करतो. समंथा रुथ प्रभूपासून ते अनुराग कश्यपपर्यंत, दिग्गज विक्रमादित्य मोटवाने आणि अनन्या यांच्या अभिनयाचं कौतुक करत आहेत. या आणखी एका ओटीटी रिलीजमध्ये, ती नेला अवस्थीची भूमिका साकारत आहे.