मुंबई - ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन हे हिंदी चित्रपटसृष्टीतील दोन प्रसिद्ध कलाकार 20 एप्रिल 2007 रोजी एका दिमाखदार समारंभात विवाहबंधनात अडकले होते. त्याचं एकत्र येणं ही त्याकाळातली बॉलिवूडमधील सर्वात खास घटना होती. दोघांनी एकमेकांशी प्रेमानं वागायला सुरूवात केल्यानंतर बच्चन कुटुंबीयांनीही ऐश्वर्याला सून म्हणून पसंत केलं होत. आता दोघांमध्ये विवाहाच्या पारंपरिक औपचारिक गोष्टी होणं बाकी होतं. उत्तर भारतीयांमध्ये विवाहापूर्वी रोका हा समारंभ पार पडतो. हा कार्यक्रम म्हणजे साखरपुडा, किंवा एंगेजमेंट स्वरुपाचा असतो. पण रोका हा विवाहचा विधी दाक्षिणात्य कल्चरमध्ये नसल्यानं ऐश्वर्या आणि तिच्या कुटुंबीयांचा ऐनवेळी कसा गोंधळ उडाला होता याविषयी तिनं सांगितलं आहे.
'रोका' समारंभ ही उत्तर भारतातील विवाहपूर्व प्रथा, दोन कुटुंबांमधील औपचारिक कराराचे प्रतीक मानली जाते. ही एक प्रकारे लग्नाच्या तयारीची सुरूवात असते. परंतु, ऐश्वर्यासाठी, रोका हा एक विधी पूर्णपणे अपरिचित होता. अभिषेकनं प्रपोज केल्यानंतर अचानक झाले हा सोहळा तिला आणि तिच्या कुटुंबाला प्रचंड गोंधळात टाकणारा हा होता.
एका चॅट शोच्या दरम्यान, ऐश्वर्यानं रोका कार्यक्रमाचे तपशील शेअर केले आणि अभिषेकच्या रोमँटिक प्रपोजनंतर हे सर्व कसं सुरू झालं याचं वर्णन केलं. याबद्दल बोलताना ऐश्वर्या म्हणाली, "रोका' समारंभ नावाचे काहीतरी आहे हे मला माहीत नव्हतं. आम्ही दक्षिण भारतीय आहोत, त्यामुळे रोका म्हणजे काय हे मला माहीत नाही, आणि अचानक त्यांच्या घरून आमच्याकडे निरोप आला की: 'आम्ही येत आहोत'."
याप्रकारानं गोंधळेल्या ऐश्वर्यानं अभिषेकला विचारणा केली. त्यावेळी अभिषेकची अवस्था कशी होती हे सांगताना ऐश्वर्या म्हणाली, "अभिषेकचा पवित्रा असा होता की, आम्ही सर्वजण येत आहोत, आता मी बाबांना रोखू शकत नाही. आम्ही तुमच्याकडं यायला निघालो आहोत. यावेळी माझी अवस्था अरे देवा, अशी झाली होती.", असं हसत ऐश्वर्यानं सांगितलं.
ऐश्वर्याचे वडील कृष्णराज राय हेदेखील रोका कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नव्हते. त्यावेळी ते शहराबाहेर होते. पारंपारिकपणे, दोन्ही पालक अशा महत्त्वपूर्ण समारंभात उपस्थित असणं आवश्यक असतं. पण ऐश्वर्याच्या वडिलांना या कार्यक्रमात फोनवरुनच सहभागी व्हावं लागलं. ऐश्वर्याची आई वृंद्या राय या अचानक घडलेल्या प्रसंगामुळे तितक्याच घाबरल्या होत्या. अमिताभ बच्चन कुटुंबासह त्यांच्या घरी आल्यावर ऐश्वर्या आणि तिची आई पूर्णपणे गोंधळून गेली होती.
अशा गोंधळातच ऐश्वर्या आणि अभिषेकचा रोका कार्यक्रम पार पडला. यानंतर ऐश्वर्याच्या बच्चन कुटुंबातील प्रवासाची औपचारिक सुरुवात झाली. या कार्यक्रमानंतर दोन कुटुंबातलं नातं अधिकच घट्ट होत गेलं. अनपेक्षित घडलेल्या या रोका कार्यक्रमानंतर या जोडप्याची प्रेमकथा आणखी फुलत गेली.
रोका समारंभानंतर, बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीनं ऐश्वर्याला सर्वात प्रतिष्ठित कुटुंबांपैकी एकाची भावी सून म्हणून तिची भूमिका पटकन स्वीकारली. सासू सासरे जया आणि अमिताभ बच्चन यांनी तिचं मनमेकळं स्वागत केलं. ऐश्वर्यानं तिला तिच्या सासरच्या लोकांकडून वर्षानुवर्षे मिळालेल्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. 2011 मध्ये, ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या संसारात आराध्या या चिमुरडीचं आगमन झालं असून त्यांचा सुखी संसार सुरू आहे.