मुंबई - इंडियाज गॉट लेटेंट या शोमध्ये केलेल्या वादग्रस्त विधानानंतर रणवीर अलाहबादियाच्या अडचणीत वाढ झाली आहे. या वादाच्या संदर्भात जनतेच्या संतापाच्या पार्श्वभूमीवर, मुंबई पोलिसांनी युट्यूबर रणवीरला समन्स बजावलं आहे.
रणवीर अलाहाबादियाला मुंबई पोलिसांचं समन्स - रणवीर अलाहाबादियानं केलेल्या वादग्रस्त विधानानंतर देशभर सोशल मीडियामध्ये संतापाची लाट पाहायला मिळाली. यानंतर महाराष्ट्र राज्य सरकारनंही कारवाईचा बडगा उचलण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधितांवर कारवाई करण्याचं आश्वासन दिल्यानंतर मुंबई पोलिसांनी आपली कारवाई तीव्र केली. अखेर रणवीर अलाहाबादियाला समन्स बजावण्यात आलं आहे. त्याच्या व्हर्सोवाच्या घरी मुंबई पोलिसांनी त्याला समन्स बजावल्याचं समजतंय. या प्रकरणी तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांसमोर हजर राहून स्पष्टीकरण देण्याची जबाबदारी आता पॉडकास्टर रणवीर अलाहाबादियाची असेल. दरम्यान समय रैनालाही मुंबई पोलिसांच्या चौकशीचा सामना करावा लागणार आहे.
संसदीय समिती अलाहाबादियाला पाठवू शकते समन्स- 'इंडियाज गॉट लेटेंट' या रोस्ट शोमधील वादग्रस्त अश्लील विधानाचं प्रकरणं देशाच्या संसदेपर्यंतही पोहोचलं आहे. या प्रकरणी संसदीय समिती अलाहाबादिया यांना समन्स पाठवण्याचा विचार करत आहे. त्या टिप्पणीशी संबंधित प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी समितीसमोर हजर राहण्यास सांगणारी नोटीस त्यालाला बजावली जाऊ शकते.
शिवसेना (यूबीटी) च्या राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या की, "विनोदी कंटेंटच्या नावानं मर्यादा ओलांडणारी कोणतीही अपशब्द स्वीकारली जाणार नाहीत. तुम्हाला मत व्यक्त करण्याचं स्टेज मिळतं याचा अर्थ असा नाही की तुम्ही काहीही बोलू शकता. त्याचे लाखो सबस्क्राइबर्स आहेत, राजकीय व्यक्ती त्याच्या पॉडकास्टवर मुलाखती देतात. पंतप्रधानांनी त्याला पुरस्कार देखील दिला आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या स्थायी समितीच्या सदस्या म्हणून मी हा मुद्दा उपस्थित करणार आहे."
रणवीर अलाहाबादीचा माफीनामा- इंडियाज गॉट टॅलेंटमध्ये पालकांबद्दल अश्लील विधान केल्याबद्दल ट्रोल झाल्यानंतर, रणवीरनं अखेर सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला होता. या व्हिडिओत तो म्हणाला, "मी जे बोललो ते अजिबात विनोद नव्हतं, विनोद करणं मला जमतही नाही. याबद्दल मला माफी मागायची आहे. जे काही घडलं त्याबद्दल के कसं घडलं वगैरे यावर स्पष्टता न देता मी माफी मागतो. मी निर्मात्यांना ती क्लिप काढून टाकण्याची विनंती केली आहे. मला माफ करा." तो पुढे म्हणाला, "पॉडकास्ट सर्व वयोगटातील लोक पाहतात. मला ती जबाबदारी हलक्यात घेणारी व्यक्ती बनायचे नाही. या प्लॅटफॉर्मचा अधिक चांगल्या प्रकारे वापर करण्याची आवश्यकता आहे, या अनुभवातून मी हेच शिकलो आहे. मी आता चांगले बनण्याचं वचन देतो."
रणवीर अलाहाबादियाला सर्व थरातून विरोध - सोशल मीडिया युजर्सनी त्याची माफी नाकारली आहे आणि असा दावा केला आहे की, त्याला त्याच्या वादग्रस्त विधानांची पूर्णपणे जाणीव होती. ही एका इंग्रजी शोपासून प्रेरित असलेलं आणि नीट रिहर्सल केलेलं स्किट होतं, असंही म्हटलं जातंय. दरम्यान, रणवीर अलाहाबादियाला सर्व थरातून विरोध होत आहे. अनेकांनी त्याला अनफॉलो केलं आहे. त्यामुळं त्याच्या फॉलोअर्सची संख्याही कमी झाली आहे. त्यानं दिलेल्या माफीनाम्यानंतरही चाहत्यांचा राग कमी झालेला दिसत नाही.