मुंबई - 'पुष्पा 2' स्टार अल्लू अर्जुनला अटक झाल्यानंतर मनोरंजन जगत हादरलं. नुकताच त्याचा पुष्पा चित्रपट रिलीज झाला आणि अनेक विक्रमांची नोंद करत त्याची लोकप्रियता प्रसिद्धीच्या शिखराला पोहोचली आहे. अशावेळी त्याच्या मागे लागलेला पोलिसांचा ससेमिरा चाहत्यांना खटकला आहे. दिवसभराच्या अनेक नाट्यमय घडामोडीनंतर त्याला न्यायलायनं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. परंतु, हायकोर्टाकडून काही वेळातच त्याला अंतरिम जामीन मिळाल्यानं दिलासाही मिळाला. फिल्म जगताच्या इतिहासात यापूर्वी अशी अनेक नाट्यमय घटना यापूर्वी घडल्या आहेत. यामध्ये शाहरुख, सलमान, संजय दत्तपासून अनेकांना पोलीस स्टेशनचा उंबरा झिजवावा लागला होता. या कलाकरांनी कोणते गुन्हे केले आणि त्यांना कशा प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागला याबद्दल जाणून घेऊयात.
शाहरुख खान: 1992 मध्ये शाहरुख खाननं त्याच्यावर आक्षेपार्ह लेख लिहिलेल्या एका पत्रकाराला झापलं होतं. त्यानं हा लेख काढून टाकण्याचा सल्ला दिला. परंतु त्यानं त्याला नकार दिला. म्हणून तो त्या पत्रकाराच्या ऑफिसमध्ये गेला आणि त्याला मारहाण सुरू केली. या घटनेनंतर पत्रकाराने शाहरुखच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आणि त्याला वांद्रे पोलिस ठाण्यात नेण्यात आले. पोलिसांनी त्याला तुरुंगात टाकले. काही वेळातच, शाहरुखच्या लक्षात आलं की आपली कृती चुकीची आहे आणि त्यानं पोलिसांना त्याला सोडून देण्याची विनंती केली. पोलिसाला ऑटोग्राफ देण्याच्या अटीवर त्याला तुरुंगातून सोडण्यात आल्याची माहिती आहे. दोन वर्षांनंतर शाहरुख खानने त्या पत्रकाराची माफी मागितली होती.
संजय दत्त :अभिनेता संजय दत्तला 1993 च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोट खटल्यात त्याच्या सहभागासाठी पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली. दत्तला एप्रिल 1993 मध्ये टाडा आणि शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत अटक करण्यात आली होती आणि नंतर 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटातील इतर आरोपींकडून अवैध शस्त्रे खरेदी केल्याबद्दल शस्त्रास्त्र कायद्याच्या उल्लंघनासाठी दोषी ठरविण्यात आलं होतं. त्याला पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली.
सलमान खान काळवीट प्रकरण : सलमान खानला 1998 मध्ये त्याच्या 'हम साथ साथ हैं' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोन काळवीट मारल्याबद्दल पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली. ऑक्टोबर 1998 ते ऑगस्ट 2007 पर्यंत, काळवीट हत्येप्रकरणी सलमाननं 18 दिवस तुरुंगात घालवले. खानला 2002 च्या हिट अँड रन प्रकरणात दोन वर्षांची शिक्षाही झाली होती.