मुंबई - Mangesh Kangane : असं म्हटलं जातं की आयुष्यात निरंतर पुढे पुढे जात राहिलं पाहिजे. मनोरंजनसृष्टीत अनेक कलाकार दिग्दर्शक वा निर्माते बनताना दिसतात. बॉलिवूडमधील प्रथितयश दिग्दर्शक संजय लीला भंसाळी काही वर्षांपासून त्यांच्या चित्रपटांचे संगीत दिग्दर्शनही करताहेत. चित्रपटातील संहितेला आणि त्यातील प्रसंगांना अनुरुप आणि आपल्या मनाप्रमाणे चाल हवी म्हणून त्यांनी ते पाऊल उचललेलं असेलही परंतु एक संगीतकार म्हणूनही आज त्यांना मान मिळताना दिसतो. मराठी चित्रपटांमध्ये गीतकार मंगेश कांगणे आता संगीतकार म्हणूनही ओळख मिळविण्याच्या प्रयत्नात आहेत. आगामी 'अप्सरा' या चित्रपटाच्या निमित्ताने गीतकार मंगेश कांगणे संगीतकार म्हणून पदार्पण करीत आहेत. नुकताच या चित्रपटाचा संगीत लॉन्च सोहळा पार पडला आणि 'धर्मवीर'चे निर्माते मंगेश देसाई आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्या हस्ते 'अप्सरा' चित्रपटाचा म्युझिक लॉन्च सोहळा संपन्न झाला.
चित्रपटसृष्टीत अनेक वर्षांचा अनुभव असलेल्या चंद्रकांत पवार यांनी या चित्रपटाची कथा, पटकथा लिहिली असून 'अप्सरा चित्रपटाचं दिग्दर्शनही केलं आहे. त्यांनी यातून नवोदित कलाकारांना संधी दिली आहे. सुयश झूंजुरके, मयूरी आव्हाड, अक्षता पाडगावकर, मेघा घाडगे, शशांक शेंडे, विठ्ठल काळे, विजय निकम, मयूर पवार, राजेश भोसले, आशिष वारंग हे कलाकार महत्वपूर्ण भूमिकांत दिसतील. ही एक प्रेमकथा असून यातून सामाजिक संदेशही देण्यात आला आहे. गीतकार मंगेश कांगणे यांनी तीन गाणी लिहिलेली असून या तीनही गाण्यांचं संगीत दिग्दर्शन त्यांनीच केले आहे. अभय जोधपूरकर, आनंदी जोशी, ओंकार स्वरुप, भैय्या मोरे, मेघा मुसळे यांनी पार्श्वगायन केलं आहे.