मुंबई - Maharashtra Shahir :'महाराष्ट्र शाहीर' हा 2023 मध्ये चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला असून हा चित्रपट आता घरी पाहाता येणार आहे. या चित्रपटाचं वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर होणार आहे. केदार शिंदे दिग्दर्शित 'महाराष्ट्र शाहीर' या चित्रपटामध्ये अंकुश चौधरी, मृण्मयी देशपांडे, अश्विनी महांगडे, दुष्यंत वाघ, अमित डोलावत, निर्मिती सावंत, सना केदार शिंदे, वाछानी योहाना आणि इतर कलाकार आहेत. या चित्रपटामध्ये अंकुश चौधरीनं शाहीर साबळे यांची भूमिका साकारली आहे. याशिवाय या चित्रपटमध्ये केदार शिंदे यांची मुलगी सना शिंदेनं शाहीर साबळे यांची पहिली पत्नी भानुमती यांची भूमिका केली आहे.
'महाराष्ट्र शाहीर'चा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर कधी होईल? : 'महाराष्ट्र शाहीर' या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. या चित्रपटाचं अनेकांनी कौतुक केलंय. 'महाराष्ट्र शाहीर' चित्रपटाच्या वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियरची प्रेक्षक आतुरतेनं वाट पाहत होते. आता त्याची प्रतीक्षा संपली आहे. हा चित्रपट 18 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी 1 आणि रात्री 8 वाजता प्रवाह पिक्चरवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटामध्ये अंकुश चौधरीनं उत्तम अभिनय केला आहे. 'महाराष्ट्र शाहीर' चित्रपटाद्वारे सना शिंदेनं मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलंय. हा चित्रपट शाहीर साबळे यांच्या आयुष्यावर आधारित आहे. शाहीर साबळे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त 'महाराष्ट्र शाहीर' हा चित्रपट निर्मिती करण्यात आला होता.