मुंबई - Ae Watan Mere Watan release date out : अभिनेत्री सारा अली खान स्टारर देशभक्तीपर चित्रपट 'ए वतन मेरे वतन' हा लवकरच रिलीज होणार आहे. या चित्रपटाबाबत आता एक अपडेट समोर आली आहे. आज 13 जानेवारी रोजी निर्माता करण जोहरनं 'ए वतन मेरे वतन' या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. याशिवाय चित्रपटाचे मोशन पोस्टरही रिलीज केलं आहे. 'ए वतन मेरे वतन' हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होत नसून ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. सारा अली खानचा हा पहिला देशभक्तीपर चित्रपट आहे, त्यामुळे ती या चित्रपटासाठी खूप उत्सुक असल्याचं तिनं एका मुलाखतीदरम्यान सांगितलं होतं.
ओटीटीवर होणार रिलीज :'ए वतन मेरे वतन' हा चित्रपट 21 मार्च रोजी ॲमेझॉन प्राइमवर प्रदर्शित होणार आहे. करण जोहरनं इंस्टाग्राम अकाउंटवर चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करत लिहिलं, ''मी तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी घेऊन आलो आहे, जागतिक रेडिओ दिनानिमित्त, 'ए वतन मेरे वतन' हा चित्रपट 21 मार्च रोजी ॲमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रसारित होईल.'' या चित्रपटात सारा अली खान स्वातंत्र्यसेनानी उषा मेहता यांच्या भूमिकेत दिसणार आहे. 'ए वतन मेरे वतन' चित्रपटाचं दिग्दर्शन कन्नयन अय्यर यांनी केलंय. चित्रपटाची कहाणी दारब फारुकी आणि अय्यर यांनी संयुक्तपणे लिहिली आहे.