मुंबई : बॉलिवूडमध्ये अनेक स्टार किड्सला लॉन्च करणारा करण जोहरनं एक घोषणा केली आहे. सैफ अली खानचा लाडका मुलगा इब्राहिम अली खानला करण हा लॉन्च करणार असल्याचं समजत आहे. करण जोहरनं त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर इब्राहिमचे काही डॅशिंग फोटो शेअर केले आणि त्याच्या बॉलिवूड पदार्पणाची घोषणा केली आहे. या पोस्टमध्ये करण हा सैफ अली खानच्या कुटुंबाशी किती जवळ आहे आणि तो इब्राहिमला लॉन्च करण्यासाठी खूप उत्सुक असल्याचं त्यानं सांगितलं आहे. आता करणची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.
करणनं शेअर केली भावनिक पोस्ट : या पोस्टमध्ये करणनं लिहिलं, 'मी फक्त 12 वर्षांचा असताना अमृता उर्फ डिंगी यांना भेटलो. त्यांनी माझ्या वडिलांबरोबर धर्मा मूव्हीजसाठी 'दुनिया' हा चित्रपट केला होता. मला त्यांचा कॅमेऱ्यावरील उत्साह खूप चांगला आठवतो. पण, मला सर्वात जास्त आठवतंय ते म्हणजे आमच्या पहिल्या भेटीनंतर त्याच्या हेअरस्टायलिस्टबरोबरचा चायनीज डिनर, त्यानंतर जेम्स बॉन्ड चित्रपट. त्याचे चांगले गुण त्यांच्या मुलांमध्येही दिसून येते. यानंतर सैफ अली खानबरोबरच्या पहिल्या भेटीची आठवण करून देताना करण लिहिलं, 'मी पहिल्यांदाच सैफला महेंद्रूच्या ऑफिसमध्ये भेटलो. तो खूप देखणा आणि साधा होता, इब्राहिम अगदी त्याच्यासारखाच आहे. मी या कुटुंबाला 40 वर्षांपासून ओळखतो. त्यांच्याबरोबर मी वेगवेगळ्या भूमिकेंसाठी काम केलंय. अमृताबरोबर 'दुनिया' आणि '2 स्टेट्स'. तसेच सैफबरोबर 'कल हो ना हो' आणि 'कुर्बान'. सारासोबत 'सिम्बा' आणि त्यानंतर येणारे अनेक चित्रपट. मी या कुटुंबाला त्यांच्या मनापासून ओळखतो. चित्रपट त्याच्या रक्तात, आत्म्यात आणि त्याच्या आवडीत आहेत. आम्ही प्रतिभेच्या एका नवीन लाटेचा मार्ग मोकळा करतो, आता मी जगाला दाखवण्यासाठी उत्सुक आहे. तर इब्राहिम अली खान तुमच्या मनात स्थान निर्माण करण्यासाठी येत आहे, म्हणून संपर्कात राहा.'