मुंबई - Kangana Ranaut : अभिनेत्री आणि वादग्रस्त भाजपा खासदार कंगना राणौत बेताल वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असते. कंगना राणौत भाजपची खासदार झाल्यापासून तिला तिच्या वादग्रस्त विधानांमुळे अनेकदा सोशल मीडियावर ट्रोल केलं गेलं आहे. नुकतेच कंगना रणौतनं शेतकरी आंदोलनात बलात्कार आणि मृतदेहांचे ढिगारे असल्याचं वादग्रस्त वक्तव्य करत समुदाय विशेषाला भडकवलं आहे. कंगनाच्या अशा वक्तव्यांचा फटका तिच्या आगामी 'इमर्जन्सी' चित्रपटाला बसू शकतो. तिचा हा चित्रपट 6 सप्टेंबरला रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होत आहे. नुकताच 'इमर्जन्सी' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला होता.
कंगनाला चप्पलनं मारण्याची मिळाली धमकी : या ट्रेलरमुळे शीख समुदाय दुखावला गेला असून कंगनाला आता शिरच्छेदाच्या धमक्या मिळात आहेत. दरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, यामध्ये कंगनाला जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे. देशाच्या करारी पंतप्रधान अशी ओळख असलेल्या दिवंगत इंदिरा गांधी यांच्या राजकीय जीवनातल्या अतिशय महत्त्वाच्या भागावर भाष्य करण्याचं काम 'इमर्जन्सी' चित्रपट करणार आहे. कंगना यात इंदिरा गांधी यांचं मध्यवर्ती पात्र साकारत आहे. मात्र आता या चित्रपटामुळे कंगनाच्या जीविताला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान 'एक्स' प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत कंगना राणौतला चप्पलनं मारण्याची आणि शिरच्छेद करण्याची धमकी दिली जात आहे. आता हा व्हिडिओ कंगना रणौतनं पंजाब पोलिसांना टॅग केला आहे.