मुंबई :अभिनेत्री कंगना राणौतचा 'इमर्जन्सी' चित्रपट 17 जानेवारी रोजी रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी अनेकजण आतुर आहेत. देशात आणीबाणी लागू करणाऱ्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावर आधारित 'इमर्जन्सी' चित्रपट आहे. या चित्रपटामध्ये कंगनानं माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली आहे. दरम्यान अलीकडेच काँग्रेस खासदार प्रियांका गांधी वाड्रा यांना कंगनानं तिचा आगामी चित्रपट 'इमर्जन्सी' पाहण्यासाठी आमंत्रित केलं आहे. कंगनानं संसदेत त्यांच्या सहकारी खासदारांशी संवाद साधताना निमंत्रण दिलं. तसेच अलीकडेच तिनं संसद भवनात प्रियांका वाड्रा यांची भेट घेतली होती.
कंगना राणौतनं दिलं प्रियांका गांधीला 'इमर्जन्सी पाहण्यासाठी आमंत्रण :भेटीदरम्यान कंगनानं प्रियांका यांना सांगितलं की, "तुम्ही 'इमर्जन्सी' चित्रपट पाहायला पाहिजे." यावर प्रियांका यांनी खूप सुंदर पद्धतीनं उत्तर दिलं, "हो, कदाचित." यानंतर कंगनानं म्हटलं, "तुम्हाला नक्की आवडेल." कंगना राणौत स्टारर 'इमर्जन्सी' हा चित्रपट अखेर प्रदर्शित होत आहे. 'इमर्जन्सी' चित्रपटामध्ये 1975मध्ये भारतात आणीबाणी लादलेली वेळ दाखविण्यात आली आहे. कंगनानं या चित्रपटाबद्दल एका संवादादरम्यान म्हटलं होतं, "मी श्रीमती गांधींना सन्मानानं चित्रित करण्यासाठी खूप काळजी घेतली आहे." या चित्रपचटाचं दिग्दर्शन कंगना राणौतनं केलं आहे.