मुंबई - Kalki 2898 AD : 'कल्की 2898 एडी' या चित्रपटाची सोशल मीडियावर खूप चर्चा होत आहे. 19 जून रोजी संध्याकाळी या चित्रपटाच्या प्रमोशनल कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये अमिताभ बच्चन, प्रभास, दीपिका पदुकोण यांच्याबरोबर कमल हासन देखील होता. या कार्यक्रमात कलाकारांनी चित्रपटाबद्दल चर्चा केली. यावेळी काही मजेदार आणि भावनिक क्षणही पाहायला मिळाले. अमिताभ बच्चन यांनी कमल हासन यांना चित्रपटाच्या पहिल्या शोचे तिकीट दिलं. यानंतर हासननं एक प्रसंग सांगितला. साऊथ चित्रपटसृष्टीत कलाकारांना चित्रपटांच्या पहिल्या शोसाठी तिकीट देण्याची परंपरा आहे.
'कल्की 2898 एडी'चं तिकीट :या कार्यक्रमात निर्माता अश्विनी दत्त यांनी अमिताभ बच्चन यांना 'कल्की 2898 एडी'चं तिकीट दिलं. हे तिकट कमल हासन आणि बिग बीनं एकत्र हातात पकडलं. अमिताभ यांना हे तिकिट मिळाल्यानंतर कमल हासन खूप खूश होते. एक जुनी गोष्ट सांगताना हासन यांनी सांगितलं की, 1975 मध्ये आलेल्या 'शोले' चित्रपटात त्यांनी टेक्नीशियनचं काम केलं आहे. 'शोले' चित्रपट पाहण्यासाठी त्यांना तीन आठवडे बराच वेळ वाट पाहावी लागल्याचं त्यांनी सांगितलं. याशिवाय त्यांनी पुढं म्हटलं, "अमिताभ बच्चन यांच्याकडून फर्स्ट डे, फर्स्ट शोचे तिकीट मिळेल असे मला कधीच वाटले नव्हते. मी तेव्हा चित्रपट टेक्नीशियन होतो आणि आता अभिनेता आहे. फारसा बदल झालेला नाही."