मुंबई - John Abraham Vedda :बॉलिवूडचा 'हँडसम हंक' जॉन अब्राहम पुन्हा एकदा ॲक्शन अवतारात दिसणार आहे. गेल्या वर्षी 2023 मध्ये जॉन शाहरुख खान स्टारर ॲक्शन चित्रपट 'पठाण'मध्ये खलनायकाच्या भूमिकेत दिसला होता. आता जॉन अभिनीत 'वेदा' नावाच्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. आज, 7 फेब्रुवारी रोजी जॉननं त्याच्या आगामी चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलं आहे. त्यानंतर काही वेळानं त्याने या चित्रपटामधील दुसरे पोस्टर रिलीज केले. या चित्रपटामधील जॉन आणि शर्वरी वाघचा फर्स्ट लूक समोर आला आहे. 'वेदा' चित्रपटामधील फर्स्ट लूकमध्ये जॉनच्या पाठीवर आणि हातात बंदूक आहेत. उजव्या हाताच्या मनगटावर त्यानं पांढऱ्या रंगाच्या पट्ट्या बांधल्या आहेत.
'वेदा' चित्रपटाचं पोस्टर :ऑलिव्ह कलरचे जॅकेट आणि ग्रे कार्गो पँटमध्ये दिसणारा जॉनचा हा लूक अनेकांना आवडला आहे. त्याच्या या पोस्टवर चाहते कमेंट्स करून त्याला आगामी चित्रपटाबद्दल शुभेच्छा देत आहेत. याशिवाय दुसऱ्या पोस्टरमध्ये जॉनसह शर्वरी पोस्टरमध्ये दिसत आहे. निखिल अडवाणी दिग्दर्शित आणि असिन अरोरा लिखित 'वेदा' ॲक्शन ड्रामा चित्रपट आहे. या चित्रपटाची निर्मिती झी स्टुडिओ, मोनिषा अडवाणी, मधु भोजवानी आणि जॉन अब्राहमनं केली आहे. 'वेदा' चित्रपटाच्या सहनिर्मात्या मीनाक्षी दास आहे. जॉन स्टारर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर 12 जुलै 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.