मुंबई - Jayasurya : अभिनेत्री मीनू मुनीरनं लैंगिक छळाचे आरोप केल्यानंतर, मल्याळम अभिनेता जयसूर्यानं अखेर आपले मौन सोडले आहे. नुकत्याच दिलेल्या एका निवेदनात त्यानं आपल्यावरील सर्व आरोप खोटे असल्याचं सांगितलं आहे. या गोष्टीमुळे त्यांच्या कुटुंबावर वाईट परिणाम झाल्याचं त्यानं म्हटलं आहे. यावर तो लवकरच कायदेशीर कारवाई करेल, असं देखील त्यानं सांगितलंय. केरळ सरकारनं जारी केलेल्या हेमा समितीच्या अहवालानं मल्याळम चित्रपटसृष्टीत गोंधळ उडाला आहे. अभिनेत्रींच्या लैंगिक छळाच्या दाव्यांनंतर अनेक दिग्गज स्टार्स चर्चेत आले आहेत.
जयसूर्यानं लैंगिक छळाच्या आरोपावर दिली प्रतिक्रिया : दरम्यान जयसूर्या सध्या आपल्या कुटुंबासह अमेरिकेत असून आज त्याचा 46वा वाढदिवस साजरा करत आहे. याबाबत सोशल मीडियावर पोस्ट करताना त्यानं लिहिलं, "आज माझ्या वाढदिवसानिमित्त ज्यांनी मला शुभेच्छा दिल्या त्या सर्वांचे आभार. माझ्या पाठिशी जे उभे आहेत त्यांचे मनापासून धन्यवाद. काही महत्त्वाच्या कामामुळे मी आणि माझे कुटुंब अमेरिकेत आहोत. गेल्या महिन्यात माझ्यावर लैंगिक छळाचे दोन खोटे आरोप करण्यात आले, यामुळे मी आणि माझे कुटुंब तुटले आहे. मी कायदेशीर मार्गानं जाणार आहे. माझे वकील या प्रकरणाशी संबंधित उर्वरित कारवाई हाताळेल. भान नसलेल्या व्यक्ती खोटे आरोप करतो. लैंगिक छळाचा खोटा आरोप त्रासदायक आहे. असत्य नेहमी सत्यापेक्षा मोठे नसते. पण मला विश्वास आहे की, सत्याचा विजय होईल. येथील माझे काम पूर्ण होताच मी परत येईन आणि माझे निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी कायदेशीर कारवाई सुरू करेल. माझा आपल्या न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे."
जयसूर्याविरुद्ध दोन तक्रारी दाखल : लैंगिक छळाच्या दोन प्रकरणात जयसूर्याचे नाव समोर आलं आहे. पहिली एफआयआर अभिनेत्री मीनू मुनीरनं काही दिवसांपूर्वी दाखल केली होती. यानंतर दुसरी एफआयआर शुक्रवारी, 30 ऑगस्ट रोजी दाखल करण्यात आली होती. मिळालेल्या माहितीनुसार केरळ पोलिसांनी सांगितलं की, "अभिनेता जयसूर्याविरुद्ध एफआयआर (FIR)नोंदवण्यात आली आहे. 25 वर्षांपासून मल्याळम फिल्म इंडस्ट्रीत काम करणाऱ्या जयसूर्याबाबत मीनू मुनीरनं दावा केला होता की, 'दा थडिया'च्या शूटिंगदरम्यान त्यानं तिच्याबरोबर गैरवर्तन केलं होतं.