मुंबई - 'बिग बॉस मराठी 5' सीझनमधील आता देखील स्पर्धक सोशल मीडियावर चर्चेत आहेत. नुकतीच इरिना रुडाकोवा धनंजय पोवारच्या घरी गेली होती. आता यानंतर जान्हवी किल्लेकरनं 'बिग बॉस मराठी 5'चा विजेता सूरज चव्हाणच्या गावी जाऊन त्याची भेट घेतली आहे. सूरज चव्हाणनं त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये त्याच्याबरोबर त्याची लाडकी बहिण जान्हवी किल्लेकर दिसत आहे. सूरज आणि जान्हवी दोघेही 'बिग बॉस'च्या घरात ७० दिवस राहून ग्रँड फिनालेमध्ये पोहचले होते. यात सूरज चव्हाण बाजी मारू त्यानं संपूर्ण महाराष्ट्राचं मनं जिंकलं.
जान्हवी भेटली सूरज चव्हाणला : जान्हवी सहाव्या क्रमांकावर असताना तिनं 9 लाख रुपये घेऊन हा खेळ सोडला होता. जान्हवी 'बिग बॉस'च्या घरात अनेकदा सूरजला खेळ समजून सांगताना दिसत होती. काहीवेळा या दोघांमध्ये भांडणे देखील झाली, मात्र तरीही सूरजनं जान्हवीला आपल्या मोठ्या बहिणीप्रमाणे मानले. 'बिग बॉस'च्या घरात सूरजनं अनेकांचं मनं जिंकलं. त्यानं अनेकदा शोमध्ये म्हटलं होतं की, तो 'बिग बॉस'ची ट्रॉफी घेऊन जाईल. या शोमध्ये अभिनेता रितेश देशमुखनं देखील सूरजला पाठिंबा दिला होता. दरम्यान सूरजनं शेअर केलेल्या फोटोंवर अनेक यूजर्स कमेंट्स करून आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.
सूरज आणि जान्हवीवर केला चाहत्यांनी प्रेमाचा पाऊस : एका व्यक्तीनं सूरजच्या पोस्टवर लिहिलं. 'बहीण भाऊ जोडी एक नंबर.' दुसऱ्या एकानं लिहिलं, 'दिवस सगळ्यांचे बदलतात फक्त संयम ठेवला पाहिजे...याच उत्तम उदाहरण म्हणजे सुरज चव्हाण.' आणखी एकानं लिहिलं, ' जान्हवी सूरजला भेटायला आली खूप छान वाटल...अशीच शेवट पर्यंत साथ राहु दे' याशिवाय काहीजण या पोस्टवर फायर आणि हार्ट शेअर करत आहेत. दरम्यान सूरज चव्हाण हा लवकरच 'झापूक झुपूक' नावाच्या चित्रपटात झळकणार आहे. कलर्स मराठीचे प्रोग्रामिंग हेड केदार शिंदे यांनी 'बिग बॉस मराठी 5'च्या ग्रँड फिनालेदरम्यान सूरज चव्हाणला मुख्य भूमिकेत घेऊन हा चित्रपट तयार करणार असल्याची घोषणा केली होती. याशिवाय सूजरचा 'राजा राणी' नावाचा चित्रपट देखील चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला आहे.