मुंबई : हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला अखेर महायुतीचा मंत्रिमंडळ विस्तार संपन्न झाला. यात महायुतीतील 39 मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. यामध्ये भाजपाकडून 19 मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. तर शिवसेनेच्या 11 मंत्र्यांनी शपथ घेतली आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या 9 मंत्र्यांनी शपथ घेतली. यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पाच नवीन चेहऱ्यांना मंत्रिपदाची संधी देण्यात आली आहे. या मंत्रिमंडळात 36 कॅबिनेट मंत्री तर 6 राज्यमंत्री असणार आहेत. दरम्यान, विरोधकांनी चहापानावर बहिष्कार टाकला. मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आपण आपल्या पदाला न्याय देणार असल्याच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
नितेश राणे :"मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर मला आनंद होत आहे. मी माझ्या मंत्रिपदाचा जनतेशी आणि कोकणाच्या जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न करेन आणि माझ्या मंत्रिपदाचा वापर हिंदुत्वासाठी करेन. जी पक्षश्रेष्ठींनी माझ्यावर जबाबदारी दिली आहे. ती जबाबदारी मी पार पाडण्याचा शंभर टक्के प्रयत्न करेन. त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करेन. हिंदू समाजानं आम्हाला मतदान केलं, म्हणून आम्ही आज शपथ घेऊ शकलो. मी माझ्या शब्दांपेक्षा माझ्या कृतीतून माझ्या मंत्रिपदाला न्याय देण्याचा प्रयत्न करेन. मंत्रिपदाचा उपयोग मी हिंदू समाजासाठी, त्यांच्या प्रगती आणि विकासासाठी करेन", अशी प्रतिक्रिया मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर मंत्री नितेश राणे यांनी दिली.
काय म्हणाले उदय सामंत? : "उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कणखर नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षातील 11 मंत्र्यांनी शपथ घेतली. महायुतीने मागच्या अडीच वर्षात अनेक विकासकामे केली आहेत आणि इथून पुढेही आम्ही विकास कामे सुरुच ठेवणार आहोत." अशी प्रतिक्रिया मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर मंत्री उदय सामंत यांनी दिली.
काय म्हणाले शंभूराज देसाई ? : "जाहीरनाम्यामध्ये जी-जी आम्ही आश्वासने दिलेली आहोत. ती आश्वासनं पूर्ण करण्याचा शंभर टक्के प्रयत्न करणार. पक्षात सर्वांना संधी मिळण्यासाठी एकनाथ शिंदेंनी अडीच अडीच वर्षांची मंत्रिपदाची संधी दिली आहे. आज ज्यांनी शपथ घेतली आहे, त्यांनी तसं लिहून दिलं आहे," अशी प्रतिक्रिया मंत्री शंभूराज देसाईंनी माध्यमांना दिली.
- कुणाच्या वाट्याला किती मंत्रिपदं? : देवेंद्र फडणवीस यांच्या रुपानं भाजपाकडं मुख्यमंत्रिपद, तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री आहेत. भाजपानं तीन महिला नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान दिलं आहे.
भाजपा कॅबिनेट मंत्री यादी : चंद्रशेखर बावनकुळे, राधाकृष्ण विखे पाटील, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, अतुल सावे, गणेश नाईक, मंगलप्रभात लोढा, शिवेंद्रराजे भोसले, जयकुमार गोरे, पंकजा मुंडे, आशिष शेलार, अशोक उईके, जयकुमार रावल, संजय सावकारे, नितेश राणे, आकाश फुंडकर, माधुरी मिसाळ, मेघना बोर्डीकर, पंकज भोईर
- शिवसेनेचे मंत्रिमंडळातील नवे मंत्री : शिवसेनेचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री झाले असून, त्यांच्या पक्षाला 9 कॅबिनेट आणि 2 राज्यमंत्रिपदं मिळाली आहेत.
शिवसेना कॅबिनेट मंत्री यादी : शंभुराज देसाई, उदय सामंत, दादा भुसे, गुलाबराव पाटील, संजय राठोड, संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, भरत गोगावले, प्रकाश आबिटकर, आशिष जयस्वाल, योगेश कदम
- राष्ट्रवादी काँग्रेस मंत्रिमंडळातील नवे मंत्री : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 8 कॅबिनेट, तर एक राज्यमंत्रिपद मिळालं आहे.
कॅबिनेट मंत्री यादी : हसन मुश्रीफ, आदिती तटकरे, बाबासाहेब पाटील, दत्तात्रय भरणे, नरहरी झिरवळ, माणिकराव कोकाटे, मकरंद जाधव-पाटील, धनंजय मुंडे, इंद्रनील नाईक
हेही वाचा -