हैदराबाद : संपूर्ण महाराष्ट्रात 'मकर संक्रांत' (Makar Sankranti 2025) हा सण उत्सवात साजरा केला जातो. वर्ष 2025 मध्ये मकर संक्रात 14 जानेवारी, मंगळवारी साजरी केली जाणार आहे. यावेळी सकाळी 8 वाजून 55 मिनिटांनी सूर्य धनु राशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करणार आहे. यामुळं 14 जानेवारीला मकर संक्रांत साजरी केली जाणार आहे. या दिवशी गंगा स्नान करणं आणि दान करणं याला विशेष महत्त्व आहे. तर मकर संक्रांतीला कोणत्या शुभ मुहूर्तावर स्नान आणि दान केल्यानं पुण्य प्राप्त होते?, जाणून घ्या ईटीव्ही भारतच्या या बातमीमधून.
का आहे मकर संक्रांत महत्त्वाची ? : हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार, मकर संक्रांतीला सूर्याची पूजा केली जाते. या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश झाल्यानं दिवस मोठा होतो आणि थंडी हळूहळू कमी होते. मकर संक्रांत हे नवीन पिकाच्या आगमनाचं प्रतीक आहे. या दिवसापासून सूर्य दक्षिणायनातून उत्तरायणाकडं सरकतो. मकर संक्रांतीच्या दिवशी गंगा, यमुना आणि इतर पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्यानं पुण्य प्राप्त होते असा समज आहे.
मकर संक्रांती शुभ मुहूर्त : मकर संक्रांतीच्या दिवशी गंगेत स्नान करून दान केल्यानं चांगलं फळ मिळतं असं मानलं जातं. पंचांग नुसार यंदा मकर संक्रांती 14 जानेवारी रोजी साजरी केली जाणार आहे. या दिवशी गंगा स्नान आणि दान करण्याचा शुभ मुहूर्त सकाळी 9.03 पासून सुरू होईल आणि संध्याकाळी 5.46 पर्यंत चालेल.
काळ्या रंगाचं महत्त्व : मकर संक्रांतीच्या दिवशी काळे वस्त्रे परिधान करण्याची प्रथा आहे. काळा रंग हा अशुभ नाही. सौभाग्य लेणं मंगळसूत्राच्या मण्यांचा रंगही काळाच असतो. मकर संक्रांतीच्या दिवशी रात्र मोठी असते. या दिवसापासून दिनमान वाढायला सुरुवात होते. काळोख्या मोठ्या रात्रीला काळ्या रंगाची वस्त्रे नेसून निरोप दिला जातो. दुसरं महत्त्वाचं वैज्ञानिक कारण म्हणजे वस्त्राचा काळा रंग हा उष्णता शोषून घेतो. मकर संक्रांती ही थंडीमध्ये येत असते. थंडीच्या दिवसात शरीर उबदार रहावं म्हणून मकर संक्रांतीला काळ्या रंगाची वस्त्रे परिधान करण्याची प्रथा आहे. थंडीच्या दिवसात तीळ हे शरीरास अत्यंत उपयोगी आहे. म्हणून तीळ-गूळ देण्याची प्रथा पडली. वर्षभरात कुणाशीही भांडणं झालं असेल, तर मकर संक्रांतीच्या दिवशी तिळगूळ देऊन ‘क्षमा करुया आणि विसरून जाऊया' हा संदेश देण्याची प्रथा आहे.
(टीप: सदरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे, 'ईटीव्ही भारत' यातील माहितीच्या सत्यतेचा दावा करत नाही.)
हेही वाचा -
मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार; जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि महत्त्व