अहिल्यानगर : राज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार सुरू असून नागपुरात मंत्र्यांचा शपथविधी होत आहे. सलग 8 वेळा शिर्डी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करणारे भाजपाचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांची महायुतीच्या मंत्रिमंडळात पुन्हा एकदा मंत्री पदी वर्णी लागली आहे.
लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या राजकीय आणि सामाजिक चळवळीत कार्यकर्ता म्हणून विखे पाटील यांनी काम केलं आहे. विविध संस्थांमध्ये पदं भूषवून सहकार क्षेत्रात त्यांनी नाविन्याची निर्मिती केली. सहकाराबरोबरच शिक्षण क्षेत्रातही त्यांनी आपल्या दुरदृष्टीकोनातून संस्थेचा पाया मजबूत केला. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्यास पूर्ण झालेली 75 वर्ष, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेची 50 वर्षांची यशस्वी वाटचाल आणि सहकारी बॅंकींग क्षेत्रात नावलौकीक प्राप्त केलेल्या प्रवरा सहकारी बॅंकेस पूर्ण झालेली 50 वर्ष यासर्वांमागं राधाकृष्ण विखे पाटील यांचं अभ्यासू नेतृत्व उपयुक्त ठरलं आहे.
शिर्डी मतदारसंघात सलग आठव्यांदा मताधिक्यानं विजय : 1995 पासून शिर्डी विधानसभा मतदारसंघाचं त्यांनी प्रतिनिधीत्व केलं. राहाता तालुक्याच्या निर्मितीपासून ते अलिकडच्या काळात स्थापन झालेलं अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय, काकडीचं विमानतळ, न्यायालयाची स्वतंत्र इमारत अशा अनेक ठळक बाबी या त्यांच्या विकासाच्या वाटचालीतील मानबिंदु ठरले आहेत. विकास कामांच्या सक्रीयतेमुळंच शिर्डी मतदारसंघातून सलग आठव्यांदा चांगल्या मताधिक्यानं निवडून जाण्याचा विक्रमही विखे पाटील यांनी नोंदवला आहे.
जिल्ह्याच्या विकास प्रक्रियेला गती : कोणत्याही मंत्रिपदाची जबाबदारी आली की, त्या विभागाचा चेहरा मोहरा बदलण्याची क्षमता विखे पाटील यांच्या नेतृत्वात आहे. सरकार आणि संघटना यांचा योग्य समन्वय साधून काम करण्याचा मोठा अनुभव विखे पाटील यांच्या पाठीशी असल्यामुळं जिल्ह्याच्या विकास प्रक्रियेला गती मिळाल्याचं पाहायला मिळालं. यापूर्वी भाजपा शिवसेनेचं सरकार असताना 1997 ते 99 या कार्यकाळात कृषी, जलसंधारण, दूग्ध व्यवसाय या विभागांची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली होती. 'ॲग्रो ॲडव्हांटेज' हे कृषि क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन भरवून त्यांनी आपल्या कार्याची वेगळी ओळख दाखवून दिली होती.
शालेय शिक्षण, विधी व न्याय, परिवहन, बंदरे विकास, गृहनिर्माण मंत्री म्हणून त्यांनी लोकहिताचे निर्णय घेण्यास प्राधान्य दिलं. अनुदानित शाळांबाबतही त्यांनी महत्वपूर्ण निर्णय घेतले. त्यामुळं अनुदानित शाळांचा मोठा प्रश्न सोडवण्यात यश आलं. स्कुलबसचं धोरणही त्यांच्याच कार्यकाळात राज्यात लागु करण्यात आलं होतं.
योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचा यशस्वी प्रयत्न : 2019 नंतर विखे पाटील यांनी भाजपात जाण्याचा निर्णय घेतला. दक्षिण लोकसभा मतदारसंघातून लोकसभेची उमेदवारी सुजय विखे पाटील यांना मिळवून मोठा विजय मिळवला. त्यानंतर जिल्हा पूर्णपणे भाजपामय करण्यासाठी त्यांचे विशेष प्रयत्न राहिले. मागील अडीच वर्षात राज्यात स्थापन झालेल्या महायुती सरकारमध्ये महसूल मंत्री पदाची मोठी जबाबदारी पक्ष नेतृत्वानं त्यांच्यावर सोपविली. अहिल्यानगरचे पालकमंत्री म्हणून 'शासन आपल्या दारी' या उपक्रमातून त्यांनी महायुती सरकारच्या विविध योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचा यशस्वी प्रयत्न केला. प्रशासनाच्या सहकार्यानं योजनांच्या अंमलबजावणीत अहिल्यानगर जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आणण्यात विखे पाटील यांचे प्रयत्न महत्वाचे ठरले.
रोजगार उपलब्ध करुन दिले : जिल्ह्याच्या दृष्टीनं 3 औद्योगिक वसाहतींना उपलब्ध करुन दिलेली जागा, निळवंडे धरण कालव्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी केलेला पाठपुरावा, गोदावरी कालव्यांच्या नुतणीकरणासाठी 200 कोटी रुपयांचा निधी त्यांनी उपलब्ध करून दिला. सावळीविहीर येथे मंजुर झालेले शासकीय पशुवैद्यकीय महाविद्यालय, काकडी विमानतळाच्या टर्मिनल इमारतीसाठी मंजुर झालेला 600 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन मतदारसंघाच्या विकासाला विखे पाटील यांनी गती दिली आहे. जिल्ह्यातील युवकांना जिल्ह्यातच रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी शिर्डीतील औद्योगिक वसाहतीमध्ये येणारे उद्योग ही मोठी उपलब्धी त्यांच्या कार्यकाळात ठरली आहे.
भविष्यात अहिल्यानगर शहरामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे राष्ट्रीय स्मारक उभारणं आणि श्रीक्षेत्र नेवासे येथील ज्ञानेश्वर सृष्टीची उभारणी हा त्यांचा संकल्प असून, जिल्ह्यातील तिर्थक्षेत्र पर्यटनाला नवी दिशा देण्याचाही त्यांचा प्रयत्न असणार आहे.
हेही वाचा