मुंबई - INDIAN 2 : एस. शंकर दिग्दर्शित 'इंडियन 2' हा बहुप्रतीक्षित चित्रपट आज 12 जुलै रोजी मोठ्या थाटामाटात प्रदर्शित झाला. 1996 मध्ये रिलीज झालेल्या इंडियन चित्रपटाचं समीक्षकांनी भरपूर कौतुक केलं होतं. प्रेक्षकांच्याही पसंतीस हा चित्रपट पडला होता. तेव्हापासून या चित्रपटाच्या सीक्वेलची प्रतीक्षा सुरू होती. या सिक्वलमध्ये, कमल हासन सेनापती म्हणून परतला आहे, एक वृद्ध स्वातंत्र्यसैनिक जागृत झाला आहे. तमिळमध्ये 'इंडियन 2', हिंदीमध्ये 'हिंदुस्थानी 2' आणि तेलुगूमध्ये 'भारतीयुडू 2' या नावाने अनेक भाषांमध्ये रिलीज झालेला हा बहुप्रतिक्षित सिक्वेल तब्बल 28 वर्षानंतर 'इडियन 2' रिलीज होत असल्यामुळे पहिल्या दिवशी पहिला शो पाहून सोशल मीडियावर मत प्रदर्शित करणाऱ्या चाहत्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे.
शुक्रवारी चित्रपट प्रदर्शित होताच, सोशल मीडिया युजर्सनी त्यांची समीक्षणे एक्स सोशल मीडियावर शेअर केली आहेत. या चित्रपटाकडून प्रेक्षकांना खूप मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया संमीश्र मिळत आहेत. दिग्दर्शक शंकर षण्मुगन यांच्या दिग्दर्शन क्षमतेवर टीका करताना, एका X युजरनं लिहिले: "चित्रपट अजिबात आकर्षक नाही. शंकर यांच्या नेहमीच्या चित्रपटांसारखी याला भावनिक जोड नाही. शंकरने हा चित्रपट खरोखरच दिग्दर्शित केला आहे का?" दुसऱ्यानं लिहिलंय: "इंडियन 2 हा चित्रपट म्हणजे 'विश्वरूपम2' पेक्षा भयंकर आपत्ती आहे. चित्रपट कंटाळवाणा झालाय, पैशाची केवळ उधळपटी झालीय."
व्हिज्युअल इफेक्ट सुपरवायझर व्ही. श्रीनिवास मोहन, संकलक ए. श्रीकर प्रसाद, प्रॉडक्शन डिझायनर टी. मुथुराज, सिनेमॅटोग्राफर रवि वर्मन आणि आर. रथनवेलू आणि संगीतकार अनिरुद्ध रविचंदर यांच्यासारखा जबरदस्त अनुभवी, प्रतिभावान कलाकार आणि क्रू असूनही चित्रपट आपली छाप सोडू शकलेला नाही. एका युजरनं चित्रपटाला अडीच स्टार दिले आहेत. त्यानं लिहिलं, "केवळ शो पूर्ण झाला. कमल हसनचा अभिनय उत्तम, मात्र शंकरनं आपली छाप सोडली नाही.
सिद्धार्थ आणि रकुलने चांगले काम केले, अनिरुद्धचे संगीत उत्तम, चित्रपटाची पटकथा आणि क्लायमॅक्स स्टंट्स चांगले झाले आहेत. मी या चित्रपटाला सर्वोत्तम म्हणणार नाही." दुसऱ्या युजरनं उपहासात्मकपणे लिहिले: "शंकर, वर्षानुवर्षे सातत्यानं कमलचा वेळ वाया घालवल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे माझा वेळ. हे स्पष्ट आहे की तुम्ही तुमचा स्पर्श गमावला आहे. कृपया लवकरच निवृत्त होण्याचा विचार करा. पहिल्यांदाच मला पळून जावेसे वाटत आहे." आणखी काही युजर्सनी मात्र चित्रपट उत्तम असल्याचं म्हटलंय. त्यानं लिहिलंय, " इंडियन 2 ची कथा आणि पटकथा सर्वोत्तम झाली आहे. दिग्दर्शक शंकर आणि कमल हासन सरांनी एक उत्तम चित्रपट दिला आहे. नकारात्मक समीक्षणाकडे दुर्लक्ष करा त्यावर विश्वास ठेवू नका आणि चित्रपटगृहांमध्ये 1000c ची मजा घ्या. रेटिंग 4.3/5"