महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

'वनवास'च्या दिग्दर्शकाला नाना पाटेकर म्हणाला 'बकवास माणूस', अनिल कपूरच्या मुलाखतीत नेमकं काय घडलं जाणून घ्या... - NANA PATEKAR

नाना पाटेकरनं 'वनवास'चा दिग्दर्शक अनिल शर्माला बकवास माणूस म्हटल्यामुळं ऐकणाऱ्यांना धक्का बसला. अनिल कपूरनं घेतलेल्या मुलाखतीत नाना नेमकं काय म्हणाला हे जाणून घ्या.

Nana Patekar
नाना पाटेकर (Nana Patekar photo from Vanwas poster)

By ETV Bharat Entertainment Team

Published : Nov 21, 2024, 4:01 PM IST

मुंबई - अनिल शर्माच्या 'वनवास' या चित्रपटातून नाना पाटेकर पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी झालेल्या मुलाखतीत नाना पाटेकरनं अनिल शर्माला 'बकवास माणूस' म्हटल्यामुळं अनेकांना आश्चर्य वाटलं. अनिल शर्माबद्दल नाना पाटेकर नेमकं काय म्हणाला याचा खुलासा अभिनेता अनिल कपूरनं घेतलेल्या मुलाखतीतून झाला आहे. अनिल कपूरनं पहिल्यांदाच नाना पाटेकरची मुलाखत घेतल्यानं ती लक्षवेधी ठरली आहे.

अनिल कपूरनं नायक चित्रपटात अमरीश पुरीची मुलाखत घेतली होती. त्यानंतर तो आता नाना पाटेकरची मुलाखत घेताना दिसला. 'वनवास' चित्रपटाच्या निमित्तानं ही मुलाखत घेताना अनिलनंही याचा उल्लेख केला. असे कोणते दिग्दर्शक आहेत ज्यांनी तुला प्रेरणा दिली, तुझ्या प्रगतीत योगदान दिलं असा प्रश्न अनिलनं विचारल्यानंतर नाना म्हणाला, "सुलभा देशपांडे, अरविंद देशपांडे आणि विजया मेहता. हे माझे आई बाप होते. त्यांनीच मला घडवलं. विजय तेंडूलकर यांच्या 'पाहिजे जातीचे' हे नाटक केलं होतं. नाटकाच्या रिहर्सल्स दिवसभर चालायच्या. त्यामुळं खूप मेहनत घेतली यामुळं करियर घडलं."

अनिल शर्माबरोबर 'वनवास'साठी नाना पाटेकर पहिल्यांदा काम करत आहे. हा चित्रपट त्याच्याकडे कसा आला याविषयी विचरलं असता नाना म्हणाला, अनिल शर्मा खूप बकवास माणूस आहे. जेव्हा त्याचा पहिला 'गदर' चित्रपट झाला ना तेव्हा मला रोज फोन करुन, 'अशी कहानी आहे... तशी कहानी आहे' म्हणून सांगायचा. पण कधी भेटायला आला नाही. बकावासगिरी करायचा माझा वेळ वाया घालवायचा. त्यामुळं मी त्याला सिरीयसली घेतलं नव्हतं.", असं म्हणताच अनिल कपूरनं हस्तक्षेप केला. नाना 'बकवास' असं जेव्हा म्हणतोय त्याचा अर्थ वेगळा 'भला माणूस' असल्याचा निर्वाळा त्यानं मुलाखतीमध्ये हजर असलेल्यांना सांगितला.

पुढं बोलताना नाना म्हणाला, "मग एकदा अनिल शर्माला भेटायला शेतावर बोलवलं. त्यानं मला कहानी ऐकवली. मी जितके पैसे मागितली त्यानं ते तितके दिले, शूटिंग अतिशय सुरळीत आणि वेळेत पार पडलं. तो म्हणतोय की, माझ्या आयुष्यातला हा पहिला चित्रपट आहे जो इतका लवकर पूर्ण झाला. सहा महिन्यात सिनेमा रिलीजसाठी तयार आहे. यात मी 28 दिवसांचं शूटिंग केलं. त्यानं मला माझ्या पद्धतीन शूटिंग करण्याची मुभा दिली. त्यामुळं त्याच्या एकाद्या सीनला चारपाच तास लागू शकले असते ते तासाभरात पूर्ण व्हायचे. नाटकात रिहर्सल करण्याची जी सवय आहे ती इथं उपयोगी पडते. शिवाय आजूबाजूला जर चांगले कलाकार असतील तर काम सोपं होऊन जातं.," असं नाना म्हणाला.

कोणत्या कलाकारांचा प्रभाव नाना पाटेकरवर आहे असं विचारलं असता तो म्हणाला, "मोतीलाल, बलराज सहानी आणि नूतन. ज्यांना पडद्यावर पाहिल्यानंतर मला प्रत्येक प्रश्नांचं उत्तर मिळून जातं. आजकाल मेथड अ‍ॅक्टींगची जी चर्चा आपण करतो ती त्या काळात मोतीलाल करत होते ते ग्रेट होते. मी परवाच 'पैगाम' चित्रपट पाहिला, दिलीपसाहब, राजकुमार साहब आणि मोतीलाल यांनी त्यात काम केलं होतं. यात सर्वात अधिक लक्ष जातं ते मोतीलाल यांच्याकडेच. नैसर्गिक अभिनय कसा असतो हे त्यांच्याकडे पाहून लक्षात येतं. नूतनजींच्या चेहऱ्याच्या पलीकडे पाहायची कधी गरजच वाटली नाही. त्यांनी कोणते कपडे घातलेत याकडं कधी लक्ष असायचं नाही. त्यांचे डोळे आपल्याला नजरबंद करुन टाकत असत." बिमल रॉय यांच्याबरोबर कधी काम करण्याची संधी मिळाली नाही याची खंत यावेळी नाना पाटेकरनं बोलून दाखवली. मीरा नायरच्या कामाचंही त्यानं कौतुक केलं.

अनिल शर्मा लिखित, निर्मित आणि दिग्दर्शित 'वनवास' हा झी स्टुडिओजचा चित्रपट जगभर 20 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. नाना पाटेकरचा दमदार परफॉर्मन्ससाठी प्रतीक्षा करणाऱ्या प्रेक्षकांसाठी हा चित्रपट एक पर्वणी असणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details