मुंबई - हृतिक रोशननं ज्या चित्रपटापासून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली त्या 'कहो ना प्यार है'च्या रिलीजला 25 वर्षे पूर्ण झाली आहेत. या निमित्तानं त्यानं आपल्या आठवणींच्या जगाची सुंदर सफर कथन केली. या चित्रपटासाठी तयार करण्यात आलेल्या हस्तलिखीत स्क्रिप्टच्या फोटोंची झलक त्यानं चाहत्यांबरोबर शेअर केली आहे.
हृतिकनं त्याच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये चित्रपटसृष्टीतील त्याच्या पहिल्या मोठ्या उपक्रमाची सुरुवात करताना त्याच्या मनातली हुरहुर, चिंता आणि उत्साह पुन्हा व्यक्त केला. त्याच्या या पदार्पणाच्या चित्रपटानं त्याला जे यश मिळवून दिलं त्यानंतर आज तो बॉलिवूडच्या आघाडीच्या प्रमुख अभिनेत्यांपैकी एक बनला आहे.
'कहो ना प्यार है' चित्रपटाबद्दल त्यानं मनापासून लिहिलेल्या नोटमध्ये हृतिक म्हणतो,
27 वर्षापूर्वीच्या माझ्या नोट्स.
एक अभिनेता म्हणून 'कहो ना प्यार है 'चित्रपटासाठी स्वतःची तयारी करताना मला आठवतंय की खूप नर्व्हस झालो होतो.
आजही नव्या चित्रपटाची सुरुवात करताना तसंच वाटतं.
हे मला शेअर करताना थोडं संकोचल्यासारखं वाटतं, परंतु गेली 25 वर्षे या इंडस्ट्रीत काम करत असल्यामुळं मला वाटतं की, मी ते हाताळू शकतो.
तेव्हा आणि आता यामध्ये काय बदल झालाय?
जेव्हा ही पानं पाहतो तेव्हा जाणवतं की काहीच बदलेलं नाही.
चांगल्या गोष्टी? वाईट गोष्टी? त्या जशाच्या तशा आहेत. फक्त पद्धत कायम आहे.
यासर्वांबद्दल आभारी आहे. यासर्वांबद्दल कृतज्ञ आहे. खूप काही करायचं बाकी आहे.
'कहो ना प्यार है'चं हे 25 वं वर्धापन वर्ष आहे.
मला माझ्या वहीमधील या पानांचं मला सेलेब्रिशन साजरं करायचं आहे.
मला फक्त एका गोष्टीचा दिलासा मिळाला आहे तो म्हणजे त्याच्या लवचिकतेचा पुरावा.
पहिल्या पानाच्या तळाशी 'एके दिवशी' असं म्हटलंय.
असा कोणताही दिवस घडला नाही, तो कधीच आला नाही. किंवा कदाचित तो आला असेल पण मी तो चुकवला असेल, कारण मी तयारी करत होतो.
'कहो ना प्यार है'च्या रिलीजच्या वेळी त्याचे हे विचार त्याच्या मनात कसे राहिले यावरही त्यानं विचार केला आहे. त्याच्या हस्तलिखित नोट्स गेल्या काही वर्षांत अपरिवर्तित राहिल्या आहेत आणि हा एक प्रक्रियेचा भाग असल्याचं सांगितलं. नोट्सच्या एका पानावर हृतिकनं त्याच्या पदार्पणाच्या भूमिकेच्या तयारीदरम्यान लक्ष केंद्रित करण्यासाठी लिहिलेले काही प्रेरक शब्द आहेत."एक आयुष्य. बस एवढंच - फक्त एक जीवन, एक संधी, हार मानू नका, छोट्या अपयशांबद्दल बोलू नका... फक्त पुढे जात राहा, खंड पडू देऊ नका,"यामध्ये त्यानं स्वतःच्या अंतःप्रेरणेवर विश्वास ठेवण्याचा आणि अपयशाला न घाबरता त्याचा स्वीकार करण्याचा सल्लाही त्यानं दिलाय.
'कहो ना प्यार है' चित्रपट २००० मध्ये प्रदर्शित झाला आणि तो प्रचंड हिट झाला होता. हृतिकचे वडील राकेश रोशन यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटातून अभिनेत्री अमिषा पटेलनंही बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. 'कहो ना प्यार है'च्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या उत्सवाचा एक भाग म्हणून, हा चित्रपट अलीकडेच थिएटरमध्ये पुन्हा प्रदर्शित करण्यात आला.
दरम्यान, हृतिक रोशन आगामी 'वॉर २' या चित्रपटामध्येही काम करणार आहे. हा चित्रपट त्याच्या २०१९ मध्ये यशस्वी झोल्या अॅक्शन-थ्रिलर 'वॉर' चा सिक्वेल आहे.