मुंबई Gudipadhva 2024 : मराठी सिनेसृष्टी, छोट्या पडद्यावरील कलाकार आणि रंगमंचावरील कलाकारांनी मुंबईत गुढीपाडवा उत्साहात साजरा केला. शेलार मामा फाउंडेशनच्या वतीनं दरवर्षी मराठी परंपरा जपण्यासाठी कलावंतांचा गुढीपाडवा चिरायू या नावानं साजरा केला जातो. मुंबईतील महालक्ष्मी इथं साजरा करण्यात आलेल्या या कार्यक्रमाप्रसंगी पडदयामागील तंत्रज्ञ आणि अन्य कर्मचाऱ्यांचा यावेळी पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.
17 वर्षांपासून सुरु आहे उपक्रम : चित्रपट अभिनेते सुशांत शेलार यांच्या संकल्पनेतून शेलार मामा फाउंडेशन आणि प्लॅनेट एमच्या वतीनं दरवर्षी गुढीपाडवा हा सण साजरा केला जातो. गुढीपाडव्याच्या आधी कलावंतांच्या उपस्थितीत चिरायू या नावानं हा सण साजरा केला जातो. शेलार मामा फाउंडेशनच्या वतीनं 17 वर्षांपासून चिरायू गुढीपाडवा साजरा केला जातो. निमित्तानं मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलावंत भेटतात त्यांच्याशी गप्पा मारता येतात आणि नवीन वर्षाचं स्वागत करता येतं. यावेळी सुद्धा आपल्याला या कार्यक्रमासाठी निमंत्रित करुन सन्मान केला. याबद्दल आभार व्यक्त करत सर्व मराठी सिने रसिकांना अभिनेते अरुण कदम यांनी आपल्या खास शैलीत नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
तंत्रज्ञ आणि अन्य कर्मचाऱ्यांचा सत्कार : यावेळी उपस्थित कलावंतांच्या हस्ते पडद्यामागील तंत्रज्ञ आणि अन्य कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. दरवर्षी पडद्यामागील काम करणाऱ्या अशा कलावंतांना सत्कार करुन त्यांच्या कामाबद्दल त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली जाते. अभिनेते, अभिनेत्री पडद्यावर दिसतात, रसिकांना ते माहीत असतात. मात्र त्यांना पडद्यावर दाखवण्यासाठी जे हात राबतात त्यांचा सत्कार होणं गरजेचं आहे आणि ते काम गेल्या 17 वर्षांपासून सातत्यानं होत असल्याबद्दल अभिनेत्री स्मिता गोंदकर हिनं आनंद व्यक्त केला.