मुंबई Salman Khan on Ganesh Festival : गणेशोत्सव देशभरात अगदी जोशात साजरा केला जातो. मुंबईसह महाराष्ट्रात तर हा सर्वात मोठा सण आहे. गणेशोत्सवाच्या दहा दिवसांच्या कालावधीत वातावरणात मांगल्याची अनुभूती येत असते. बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटीही त्यांच्या घरी गणपती बाप्पाची स्थापना करतात आणि काही दिवस भक्तिभावाने गणरायाची सेवा केल्यानंतर गणेश मुर्तीचं विसर्जन करतात. सलमान खानचं कुटुंबही हा सण मोठ्या जल्लोषात साजरा करतं. सलमाननं यंदा गणपती बाप्पांबाबत लोकांना आवाहन केलं आहे. विसर्जनानंतर मुर्तीचे अवशेष विखुरलेले राहू नयेत यासाठी प्रत्येकानं घरी इको-फ्रेंडली गणपती आणण्याचं आवाहन त्यानं कार्यक्रमात केलं.
सलमान खानचं लोकांना आवाहन : पर्यावरणपूरक इको-फ्रेंडली गणेश मूर्तीं ही निसर्गासाठी देखील योग्य असते, हे सर्वांना माहीत आहे. दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये सलमान खान स्टेजवरुन सर्वांना संबोधित करत म्हणतो, "इको-फ्रेंडली गणेश आणा आणि त्याचे विसर्जन तुमच्या सोसायटीत, तुमच्या इमारतीत, घरात करा. जेणेकरुन मूर्ती पूर्णपणे विरघळेल. यानंतर त्यानं पुढं म्हटलं, "किती वाईट वाटतंय की तुम्ही लोक पीओपीचा गणपती बनवता आणि मग विसर्जन करता. यानंतर समुद्राजवळ गेलात तर बरं वाटतं का? अर्धा गणेश तिथं पडलेला दिसतो. जेव्हा तुम्ही तिथं जाता, तेव्हा तुमचा पाय त्यांना स्पर्श करतो आणि ही चांगली गोष्ट नाही. त्यामुळे इको फ्रेंडली गणपती घरी आणा."