मुंबई - अजय देवगण, संजय दत्त, सोनाक्षी सिन्हा आणि जुही चावला यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'सन ऑफ सरदार' या कॉमेडी ड्रामा चित्रपटाचे दिग्दर्शक अश्विनी धीर यांचा १८ वर्षांचा मुलगा जलज धीर याचा रस्ता अपघातात मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जलज धीरचा 23 नोव्हेंबर रोजी रस्ता अपघातात मृत्यू झाला. तो आपल्या तीन मित्रांसह घरी न सांगता कारमधून फिरायला गेला होता, असे बोलले जात आहे. जलज याच्याबरोबर असलेल्या त्याच्या एका मित्राचाही कार अपघातात मृत्यू झाला. जलजचा मित्र दारूच्या नशेत कार चालवत होता, असंही समजलं आहे.
ताशी 120-150 वेग असलेली कार विलेपार्ले येथे नियंत्रणाबाहेर गेली आणि सर्व्हिस रोड आणि पुलाच्या दरम्यानच्या दुभाजकाला धडकली. दरम्यान, या अपघातात जलज आणि त्याचा मित्र सार्थक कौशिक यांचा जागीच मृत्यू झाला. जलज धीरचा मित्र जेडेन जिमी यानं विलेपार्ले पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. जलजच्या मित्राच्या तक्रारीवरून पोलिसांनी कार चालवणाऱ्या साहिल मेंढा याला अटक केली आहे.
अपघात कधी आणि कुठे आणि कसा झाला?
वृत्तानुसार, गोरेगाव पूर्व येथील जलजचे मित्र एकत्र जमले आणि रात्री 3.30 वाजेपर्यंत व्हिडिओ गेम खेळले. यानंतर जलज आपल्या मित्रांसह कारने लाँग ड्राईव्हला निघाले. त्यानंतर वांद्रे येथील सिगडी रेस्टॉरंटमध्ये सर्वांनी जेवण करून पहाटे ४.१० वाजता प्रवासाला सुरुवात केली. साहिलचे नियंत्रण सुटले आणि कार थेट सर्व्हिस रोड आणि पुलाच्या दरम्यान असलेल्या दुभाजकावर जाऊन आदळली. कार चालवत असलेल्या साहिलला किरकोळ दुखापत झाली असली तरी जलज आणि सार्थक गंभीर जखमी झाले आणि त्यांचा मृत्यू झाला.