मुंबई - Love In Vietnam : 77 व्या कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये यावेळी भारतीय अभिनेत्रीचा बोलबाला होता. आता भारतीय चित्रपट, कानमध्ये कहर करत आहेत. दरम्यान, कानमधून भारतासाठी आणखी एक अभिमानाचा क्षण समोर आला आहे. 'लव्ह इन व्हिएतनाम' हा भारत-व्हिएतनामच्या सहकार्यानं बनलेला पहिला चित्रपट कान फिल्म फेस्टिव्हल 2024मध्ये लॉन्च करण्यात आला. 'लव्ह इन व्हिएतनाम'चं फर्स्ट लूक पोस्टर कान 2024 मध्ये अनावरण केल्यानंतर हा चित्रपट आता सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. 'लव्ह इन व्हिएतनाम' या चित्रपटात भारतीय अभिनेत्री अवनीत कौर आणि व्हिएतनामी अभिनेत्री खा नगान महत्त्वाच्या भूमिकेत आहे.
'लव्ह इन व्हिएतनाम' फर्स्ट लूक :तसेच 'लव्ह इन व्हिएतनाम' चित्रपटात गंगूबाई काठियावाडी फेम अभिनेता शांतनु माहेश्वरी देखील प्रमुख भूमिकेत आहे. आता शेअर केलेल्या पोस्टरमध्ये या चित्रपटामधील प्रमुख स्टार कास्टची झलक दिसत आहे. दरम्यान, अवनीत कौरनं कानमधून काही फोटो तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत. या पोस्टवर तिनं लिहिलं, "कानमध्ये 'लव्ह इन व्हिएतनाम' चित्रपटाचा फर्स्ट लूक पोस्टर शेअर करताना अभिमान वाटत आहे, भारत आणि व्हिएतनामच्या फिल्म इंडस्ट्रीचे हे पहिले सहकार्य आहे, मी खूप आनंदी आहे." 'लव्ह इन व्हिएतनाम' या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन राहत शाह काझमी यांनी केलं आहे.