पुणे - महात्मा फुले यांच्या नावानं दिला जाणाऱ्या समता पुरस्कार 2024 चा वितरण सोहळा पुण्यातील फुले वाड्याच्या समता भूमीत पार पडला. यंदाचा हा पुरस्कार प्रतिभावान लेखक, निर्माता, अभिनेता आणि दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना देण्यात आला. माजी मंत्री आणि महात्मा फुले समता परिषदेचे अध्यक्ष छगन भुजबळ यांच्या हस्ते याचं वितरण करण्यात आलं. पुरस्कार सोहळ्याला सुरुवात होण्यापूर्वी ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आलं. त्यानंतर शाहु महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेलाही अभिवादन करण्यात आलं.
यावेळी बोलताना नागराज मंजुळे म्हणाले, "हा पुरस्कार मिळाल्यानं खूप आनंद झालाय आणि कृतज्ञ वाटतंय. समता परिषद आणि भुजबळ सांहेबांचं आभार मानतो. या सर्वांनी माझी दखल घेतली. फुल्यांची आणि माझी ओळख ज्या टप्प्यावर झाली तो क्षण माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्यापूर्वी मी अंधश्रद्धा, भांडण, व्यसनात गुंतलो होतो. माझे वडील दगड फोडणारे होते, त्यांना या महापुरुषांविषयी काही फारसं वाटतं नव्हतं. त्यांच्यासाठी त्यांच्या देवाच्या प्रतिमाच सर्व काही होत्या. मी जेव्हा बाबासाहेबांचा फोटो माझ्या घरात लावला तेव्हा माझ्याशी वडील खूप भांडले होते. आपल्या जातीतल्याचं महापुरुषाला पुजण्याची एक प्रथा तयार झाली आहे. प्रत्येकानं असं केलं तर जगण्याला काही अर्थ नाही. त्यावेळी मी बाबासाहेबांचा फोटो लावला, त्यावेळी माझ्यापाशी फुलेंचा फोटो नव्हता तर मी त्यांचं चित्र काढलं होतं. त्यावेळी फुलेंनी आपल्या समाजासाठी काय केलं हे वडिलांना सांगत असे. त्यावेळी फुलेंचं समग्र साहित्य मी वाचलं होतं. आंधळं असणं आणि डोळस असणं यामुळे जसा फरक पडतो तसा फरक मला फुलेंचं साहित्य वाचताना कळला होता."
महात्मा फुलेंच्या समतेचा विचार पुढं नेण्याची गरज असल्याचं सांगताना नागराज पुढं म्हणाले, "महात्मा फुले हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचे वंशज होते, फुलेंचे वंशज आंबेडकर आहेत. आपण ज्यांच्या पोटी जन्मलो त्यांचेच आपण वारसदार नसतो, तर अशा महापुरुषांचेही आपण वंशज असतो. महात्मा फुले, आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज हे माझे पूर्वज आहेत. हे मानायला पाहिजे आणि जातीच्या या संकुचित विचाराला संपवलं पाहिजे. फुल्यांनी महाराजांचे उपकार मानलेत. त्यांच्यावर त्यांनी कुळवाडी भूषण नावाचा पोवाडा रचला होता. तेव्हा कळतं की ही परंपरा कुठून आली आहे."
महापुरुषांच्या संघर्षामुळं आणि विचारांच्यामुळं जगणं सोप झाल्याचं मंजुळे यांनी सांगितलं. "फुल्यांनी त्यांच्या मृत्यूपत्रात लिहिलंय की, माझी संपत्ती यशवंताला द्यावी. पण तो जर का माझ्या विचारांची वाट चुकला तर ही संपत्ती त्याला न देता एखाद्या माळ्याला, कुळवाड्याला नाहीतर धनगराला देऊन टाकावी. ही गोष्ट आता शक्य आहे का. इतका विचारांशी एकनिष्ठ असणारा हा माणूस आहे. हे बघून मला एक हरिवंशराय बच्चन साहेबांची एक कविता आठवली. त्यांची एक ओळ आहे, "मेरे बेटे, बेटे होने से मेरा उत्तराधिकारी नही होंगे, जो उत्तराधिकारी होंगे वो मेरे बेटे होंगे." जे तमुचा विचार पुढं घेऊन जातात तेच तुमचे खरे वारसदार असतात. समतेची ही परंपरा सतत वाहत आली आहे. ही माणसं नसती तर आपलं जगणं सोपं झालं नसतं. त्यावेळी समतेचा हा जर विचार मी करु शकलो नसतो.
''शंभर वर्षापूर्वी जे घडत होतं, त्यात बहुजन वर्गाला अजिबात थारा नव्हता. जे सवर्ण आहे आणि तरीही सम्यक आहेत, त्यांचाही काही उपयोग झाला नसता. त्यांनाही वाळीत टाकलं गेलं असतं. या शंभर वर्षात आपलं जे जगणं बदललंय, ते हे लोक नसते तर आपलं जीवन सुखाचं राहिलं नसतं. हे जग जे बदलतं त्यासाठी काही लोक खूप संघर्ष करतात, आयुष्य पणाला लावतात आणि आपल्यासाठी हे सुकर जगणं तयार करतात. या महापुरुषांच्या पुण्याईनं आपण इथं आहोत. त्याची कृतज्ञता माझ्या मनात सतत असते."
वाचण्याचं महत्त्व सांगताना नागराज मंजुळे म्हणाले, ''मी जो विचार स्वीकारला त्याला माझे वडिलच विरोध करत होते. पण त्यांना हळूहळू समजावावं लागलं, विचारांचा संघर्ष करावा लागला. जो समतेचा विचार घेऊन मी पुढं जात होतो, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन जगत होतो त्यासाठी तुम्ही मला हा समता पुरस्कार देऊन सन्मानित केलं, त्याचा मला फार आनंद होतोय. तुम्हा सर्वांनी महात्मा फुलेंचं समग्र साहित्य एकदा डोळ्याखालून घातलं पाहिजे. आपल्याला पुढं जायचं असलं तर सतत वाचत राहिलं पाहिजे. तरच आपल्या हक्कांची जाणीव होईल आणि आपण नीटपणे जगू शकू."
''चारशे वर्षापूर्वी जिजाऊंनी आई म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये या समतेच्या विचारांची पायाभरणी केली होती. ती जिजाऊंचा विचारधारा महाराजांनी पुढं नेली, शिवाजींचा हा विचार फुलेंनी पुढे नेला आणि पुढं हाच विचार बाबासाहेबांनी पुढं नेला. अमेरिकेसारख्या देशात स्त्रीयांना मताचा अधिकार मिळण्यासाठी महिलांना रस्त्यावर उतरुन संघर्ष करावा लागला होता. मात्र बाबासाहेबांनी हा अधिकार घटनेच्या माध्यमातून त्यांनी न मागताच दिला. या सावित्रीमाईंचं आणि ज्योतिबा फुलेंचं स्मरण आपण सतत बाळगलं पाहिजे, त्यांचे उपकार मानले पाहिजेत", असंही नागराज मंजुळे आपल्या भाषणात म्हणाले.''