मुंबई - Bengal 1947 :देवोलिना भट्टाचार्जी स्टारर 'बंगाल 1947: ॲन अनटोल्ड लव्ह स्टोरी'चा ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटात 1947मधील इतिहास दाखविण्यात आला आहे. 1947मध्ये देशामध्ये जी उलथापालथ झाली होती ते या चित्रपटामध्ये उत्तमप्रकारे मांडण्यात आलं आहे. हा चित्रपट भारताच्या फाळणीवर आधारित आहे. 'बंगाल 1947: ॲन अनटोल्ड लव्ह स्टोरी' चित्रपट 29 मार्च रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. देवोलिना भट्टाचार्जीनं 'बंगाल 1947' मधून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली आहे.
'बंगाल 1947: ॲन अनटोल्ड लव्ह स्टोरी'चा ट्रेलर रिलीज :या चित्रपटाचा ट्रेलर हा 1.29 सेंकदाचा आहे. यामध्ये 1947 रोजी भारताची फाळणी झाल्यामुळे निर्माण झालेला गोंधळ आणि एक सुंदर अशी प्रेमकहाणी दाखवली गेली आहे. या चित्रपटाचं लेखक आणि दिग्दर्शन आकाशदित्य लामा यांनी केलंय. 'बंगाल 1947' या चित्रपटाविषयी बोलताना देवोलिना भट्टाचार्जी म्हटलं होतं, ''मी ही भूमिका करण्यास नकार देऊ शकले नाही. या चित्रपटामुळे, मी दिग्दर्शक आकाशदित्य लामा यांना पुन्हा भेटू शकले. मला माझ्या कारकिर्दीच्या सुरुवातीला त्यांच्या 'मोहेंजोदारो' नाटकात काम करण्याची संधी मिळाली होती. याव्यतिरिक्त, बंगाली आणि आसामी वारशामुळे चित्रपटाच्या एक अनोख्या विषयाबरोबर जुळण्यासाठी मी प्रेरित झाले.''