मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या काही वर्षापासून नियमितपणे देशातील परीक्षार्थी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना मार्गदर्शन आणि जिद्दीनं पुढं जाण्याबद्दलची प्रेरणा देत असतात. त्यांच्या बहुप्रतिक्षित 'परीक्षा पे चर्चा' या कार्यक्रमाच्या आठव्या भागात त्यांनी देशभरातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. सोमवारी प्रसारित झालेल्या या भागात पंतप्रधानांनी अनेक विषयांवर माहिती दिली. ज्यामध्ये स्मार्ट पोषण टिप्स, परीक्षेचा दबाव व्यावसायिकरित्या हाताळणं आणि चांगलं नेतृत्वगुण यासारखे विषय समाविष्ट होते. आता या कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागात, विद्यार्थ्यांसाठी काहीतरी खास घडणार आहे कारण बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण विद्यार्थ्यांना भेटणार आहे.
दीपिकानं विद्यार्थ्यांना दिल्या मानसिक आरोग्याच्या टिप्स - दीपिका पदुकोण 'परीक्षा पे चर्चा'च्या दुसऱ्या भागात दिसणार आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या टीझरमध्ये, ती तिच्या शालेय दिवसांबद्दल मोकळेपणानं बोलताना दिसत आहे. यात तिनं अनेक विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि त्यांच्यातील नैराश्याबद्दलही ती बोलली. दीपिकाने तिचा अनुभव सांगितला आणि मानसिक आरोग्य तुमच्या आयुष्यातील इतर पैलूंवर कसा परिणाम करतं याविषयी सांगितलं.