मुंबई -बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही आज 6 फेब्रुवारी तिचा 33वा वाढदिवस साजरा करत आहे. तिच्या वाढदिवशी, तिला बॉलिवूड स्टार्स आणि चाहत्यांकडून शुभेच्छा दिल्या जात आहेत. बॉलिवूडची डान्सिंग क्वीन म्हणून ओळखली जाणारी नोरा फतेही मूळची कॅनडाची आहे. चित्रपटांची आवड आणि ग्लॅमरच्या जगात नाव कमावण्याची इच्छा असल्यामुळं नोरा मुंबईत आली. मुंबईत आल्यानंतर तिनं खूप मेहनत केली. तिनं जबरदस्त डान्स करून प्रेक्षकांना वेड लावलं. नोरा सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. तिचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. तिला इन्स्टाग्रामवर 47 दशलक्षाहून अधिक लोक फॉलो करतात.
नोरा फतेहीची बॉलिवूडमध्ये एंड्री :नोरा फतेहीनं आतापर्यंत 45हून अधिक प्रोजेक्ट्ससाठी काम केलं आहे. यातील अनेक चित्रपटांमध्ये नोरानं आयटम नंबर केले आहेत. नोरा चित्रपटांबरोबर म्युझिक व्हिडिओमध्येही काम करते. नोरानं 2014 मध्ये 'फगली' या चित्रपटातून तिच्या करिअरची सुरुवात केली. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही विशेष कामगिरी करू शकला नाही. यानंतर नोरानं बॉलिवूडमध्ये नाव कमवण्यासाठी खूप संघर्ष केला. यानंतर तिनं 2014मध्ये 'रोर: टाइगर ऑफ सुंदरबन' या चित्रपटातही काम केलं. तिचा सलग दुसरा चित्रपट देखील बॉक्स ऑफिसवर वाईटरित्या फ्लॉप झाला. यानंतर नोरा 'टेंपर' आणि 'मिस्टर एक्स' सारख्या चित्रपटांमध्ये दिसली.