मुंबई - वास्तववादी व्यक्तिरेखा साकरण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या कलावंतांच्या यादीत छाया कदमचं नाव सध्या अग्रस्थानी आहे. तिनं आजवर साकारलेल्या भूमिकातून तिनं हे समप्रमाण सिद्ध करुन दाखवलंय. किरण राव दिग्दर्शित 'लापता लेडीज' हा चित्रपट सध्या भारताच्या वतीने ऑस्कर पुरस्कारासाठी नामांकन झालेला आहे. यातही तिनं 'मंजू माई' ही अशीच वास्तववादी भूमिका केली होती.
आज 22 जानेवारी हा दिवस छाया कदमसाठी खूप खास आहे. आज तिच्या महत्त्वाच्या भूमिका असलेल्या 'रानटी' आणि 'ऑल वुई इमॅजिन एज लाईट' हे दोन चित्रपट थिएटरमध्ये रिलीज होत आहेत. तर आजच्याच दिवशी गजेंद्र अहिरे दिग्दर्शित 'स्नो फ्लॉवर' हा चित्रपट गोव्याच्या इफ्फी महोत्सवात दाखवला जाणार आहे. छाया कदम आणि वैभव मांगले यांच्या भूमिका असलेल्या या चित्रपटाचा इफ्फी 2024मध्ये गाला प्रीमियर होणार आहे.
"ऑल वुई इमॅजिन अॅज लाइट" - ३० वर्षानंतर पहिल्यांदाच प्रतिष्ठित कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये मुख्य स्पर्धेसाठी भारतीय चित्रपट म्हणून हा चित्रपट निवडला गेला होता. त्यानंतर मामी फिल्म फेोस्टीव्हलमध्येही या चित्रपटाची उत्तम कामगिरी पाहायला मिळाली. आज हा चित्रपट थिएटरमध्ये दिसणार असल्यामुळे आशयघन कलात्मक चित्रपटांची आवड असणाऱ्यांसाठी ही एक पर्वणी असेल. पायल कपाडिया दिग्दर्शित 'ऑल वुई इमॅजिन अॅज लाइट' या चित्रपटाचं कथानक अनु आणि प्रभा या दोन नसर्सेच्या जीवनावर बेतलेलं आहे. यामध्ये छाया कदम 'पार्वती' ही व्यक्तिरेखा साकारत आहे.
छाया कदमला आपण आईच्या भूमिकेत अनेक चित्रपटातून आपण पाहिलं आहे. एक सोशिक, अन्यायग्रस्त महिला, एक कष्ट करणारी बाई अशी तिची प्रतिमा बनली होती. अगदी 'फँड्री'पासून 'कौन प्रवीण तांबे'पर्यंत ती आईच्याच भूमिकेत दिसली. अगदी आज रिलीज होत असलेल्या तिच्या 'रानटी' चित्रपटातही ती आईचीच भूमिका साकारत आहे. परंतु ही इमेज ब्रेक करण्याची संधी तिला 'मडगाव एक्सप्रेस'नं दिली आणि त्याचं तिनं सोनं केलं. या चित्रपटात तिनं 'कांचन कोंबडी' ही लेडी डॉनची अफलातून भूमिका साकारली होती. कुणाल खेमू दिग्दर्शित या चित्रपटानं तिला अतिशय वेगळ्या अवतारात प्रेक्षकांसमोर ठेवलं आणि तिच्या भूमिकेचं खूप कौतुक झालं.
छाया कदमनं हिंदी आणि मराठीसह इतर भारतीय चित्रपटातूनही आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. मराठी रंगभूमीवर उत्कृष्ट कलाकार ठरलेली छाया कदम स्वतःला कुठल्याही एका चौकटीत अडकवू इच्छित नाही. आज कान्स फिल्म फेस्टीव्हलपासून, 'मामी'सह 'इफ्फी'पर्यंत तिच्या अभिनयाची चर्चा सुरू आहे. आगामी ऑस्कर पुरस्काराच्या निमित्तानंही तिच्या अभिनयाची दखल जागतिक स्तरावर घेतली जाईल हे नक्की. तिच्या भावी वाटचालीसाठी ईटीव्ही भारतच्या हार्दिक सदिच्छा!