मुंबई : बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी मंगळवारी 12 नोव्हेंबर रोजी एका सॉन्ग राइटरला अटक केली. या आरोपीनं धमकीचे संदेश पाठवल्याचा आणि गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या नावानं त्याच्याकडून 5 कोटी रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, पोलिसांनी सांगितलं की, आरोपी सोहेल पाशाला रायचूरला कर्नाटक येथून अटक करण्यात आली आहे. त्याला एक गाणं प्रसिद्ध करायचं होतं, त्यासाठी त्यानं ही युक्ती अवलंबली. 7 नोव्हेंबर रोजी मुंबई वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सॲप हेल्पलाइनवर अनेक मेसेज आले होते. यात संदेश पाठवणारा लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सदस्य असल्याचं सांगण्यात आलं असून 5 कोटी रुपये न दिल्यास सलमान खानला ठार मारले जाईल, असं म्हटल्या गेलं होतं.
सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याला अटक : मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं रायचूर येथून, ज्या मोबाईल क्रमांकावरून संदेश आले होते त्याचा शोध घेतला. याप्रकरणी अधिकाऱ्यानं सांगितलं की, एक टीम कर्नाटकला पाठवण्यात आली आणि या नंबरचा मालक व्यंकटेश नारायण याची चौकशी करण्यात आली. मात्र नारायणच्या मोबाईलमध्ये इंटरनेटची सुविधा नव्हती. त्याच्या फोनवर व्हॉट्सॲप इन्स्टॉलेशनचा ओटीपी आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. नारायणनं पोलिसांना सांगितलं की, 3 नोव्हेंबर रोजी एक अनोळखी व्यक्ती त्याच्याजवळ आला आणि त्यानं नारायणचा फोन घेऊ का असं विचारले. यानंतर नारायणचा मोबाइल नंबर वापरून ओटीपी त्या व्यक्तीनं त्याच्या मोबाइलवर व्हॉट्सॲप इन्स्टॉल केले होते.