मुंबई - Bigg Boss Marathi 5 : 'बिग बॉस मराठी 5' हा शो आता खूप लोकप्रिय झाला आहे. या शोचा आता पाचवा आठवडा संपेल. शोच्या पहिल्या दिवसापासून दोन टीम घरात तयार झाल्या होत्या. आता या दोन्ही टीममध्ये फूट पाहायला मिळत आहे. घरातील अनेक सदस्य निक्की तांबोळीच्या विरोधात आहेत. दरम्यान काल रात्रीच्या एपिसोडमध्ये भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखनं याबाबत घरातील सदस्यांची कानउघडणी केली. याशिवाय अरबाजला देखील यावेळी रितेशनं चांगलचं सुनावलं. बिग बॉसच्या निर्मात्यांनी एक नवीन प्रोमो आता शेअर केला आहे. यामध्ये रितेश हा घरातील सदस्यांबरोबर बोलताना दिसत आहे.
बिग बॉसमध्ये घरातील सदस्यांना मिळेल शॉक : बिग बॉसच्या नवीन प्रोमोमध्ये रितेश घरातील सदस्यांना म्हणतो, "माणसं ओळखायला चुकलात तर शॉक बसतो." भाऊच्या धक्क्यावर रितेश हा घरातील सदस्याबरोबर एक खेळ खेळताना दिसणार आहे. या खेळात रितेश शॉक देणाऱ्या खुर्चीवर घरातील सदस्यांना बसायला लावतो. त्यांना काही प्रश्न विचारतो. जर या प्रश्नाचे उत्तर चुकीचे असले तर, सदस्याला शॉक दिला जातो. या खेळात घरातील सदस्यांची चांगलीच तारांबळ उडालेली प्रोमोत दिसून येत आहे. या प्रोमोमध्ये घरातील अनेक सदस्यांना शॉक बसतो. हा खेळ खूप मनोरंजक असल्याचा दिसत आहे. याशिवाय अनेक चाहते या पोस्टवर कमेंट्स करत आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.