मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री आथिया शेट्टी आणि क्रिकेटर के एल राहुल यांच्या घरी पाळणा हालणार आहे. आथियानं आपल्या प्रेग्नंसीची घोषणा तिच्या सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून केली आहे. 2025 मध्ये आपल्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन होणार असल्याचे संकेत आथियानं या पोस्टमधून दिले आहेत. ही बातमी कळल्यानंतर तिला चाहत्यांकडून भरपूर शुभेच्छा दिल्या जात आहेत. ही बातमी अर्थातच आथियाचे वडील सुनिल शेट्टी आणि त्याच्या कुटुंबियांसाठी आनंदाची आहे. शेट्टी आणि के एल राहुलच्या परिवाराला यामुळे मोठा आनंद झाला आहे.
दीपिका पदुकोण-रणवीर सिंग, रिचा चढ्ढा-अली फजल आणि यामी गौतम या बॉलिवूड सेलेब्रिटीच्या जोडीनंतर आता अथिया आणि केएल राहुल देखील पालक क्लबमध्ये सामील होणार आहेत. आथियानं पोस्ट शेअर केल्यानंतर तिच्या मित्र, मैत्रीणी, नातेवाईकांसह फिल्म इंडस्ट्रीतील अनेकांनी शुभेच्छा द्यायला सुरुवात केली. जॅकी श्रॉफ यांची मुलगी कृष्णा श्रॉफ, आथियाचे वडील सुनिल शेट्टी, भूमी पेडणेकर, रिद्धीमा कपूर यांनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहेत. याशिवाय अभिनेत्री शिबानी दांडेकर यांच्यासह सेलिब्रिटींनी या जोडप्याला कमेंट करून शुभेच्छा दिल्या आहेत.