मुंबई -अभिनेत्री रुपाली गांगुली आणि गौरव खन्ना स्टारर 'अनुपमा' ही मालिका टीआरपी चार्टमध्ये नेहमीच टॉपवर होती. आता 'अनुपमा'च्या टीआरपीमध्ये गेल्या काही दिवसांपासून घसरण पाहायला मिळत आहे. याशिवाय गेल्या काही महिन्यांपासून हा शो काही वादांमुळे चर्चेत आहे. अलीकडेच, 'अनुपमा'मधील अनेक कलाकारांनी शोला टाटा-बाय-बाय केला आहे. दुसरीकडे, रुपाली गांगुलीच्या वैयक्तिक आयुष्यातही सध्या गोंधळ सुरू आहे. दरम्यान 'अनुपमा' शोच्या सेटवर एक मोठा अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. 'अनुपमा'च्या टीममधील एका सदस्याला आपला जीव गमवावा लागला आहे.
'अनुपमा' मालिकेतील कॅमेरा असिस्टंटचा मृत्यू :सोशल मीडियावर या अपघाताबाबत एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये सेटवर विजेचा झटका लागल्यानं क्रू मेंबरचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलंय. या घटनेनंतर या व्यक्तीला रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. क्रू मेंबरला काही तांत्रिक गोष्टी हाताळत असताना विजेचा झटका लागला. या क्रू मेंबरचा चुकून विजेच्या तारेला स्पर्श झाला होता. दरम्यान ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश गुप्ता यांनी या घटनेबाबत नाराजी व्यक्त केली. 'अनुपमा'च्या सेटवर असा निष्काळजीपणा आणि प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आता केला जात आहे.