महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

संत तुकारामांच्या अभंगगाथेवरील 'आनंदडोह' चित्रपटाची घोषणा, दिग्पाल लांजेकर करणार दिग्दर्शन

संत तुकारांच्या अभंगगाथा तत्कालिन पंडितांनी इंद्रायणीच्या डोहात बुडवल्या. ही गाथा लोकमानसात कशी तरली याची कथा असलेल्या 'आनंदडोह' चित्रपटाची घोषणा दिग्पाल लांजेकर यांनी केली आहे.

Sant Tukaram's Abhangagatha announced
'आनंदडोह' चित्रपटाची घोषणा (Abhangagatha team)

By ETV Bharat Entertainment Team

Published : Nov 13, 2024, 12:58 PM IST

मुंबई - अमृताशी पैजा जिंकणाऱ्या मराठी भाषेतील संत विचारावर महाराष्ट्र समृध्द झाला आहे. या संतांनी अभंग-श्लोक-ओव्या याच्या रचनांमधून अभिजात साहित्याचा अलौकिक ठेवा मराठी भाषेला दिला. अध्यात्म, रुढी-परंपरांकडे पाहण्याची एक निर्मळ दृष्टीही बहाल केली आहे. आजच्या काळात या अपार दृष्टीची आपल्या सर्वांना नितांत आवश्यकता आहे. ‘शिवराज अष्टकाच्या’ माध्यमातून लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज अन त्यांच्या शूर शिलेदार आणि मावळ्यांचा इतिहास जागतिक सिनेमांच्या पातळीवर नेऊन ठेवलाय. ‘शिवराज अष्टक' नंतर आता संत साहित्याचे समृद्ध संचित घराघरांत पोहोचावण्यासाठी दिग्पाल लांजेकर यांनी आता एक पाऊल पुढं टाकलं आहे.

‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ हा चित्रपट बनवल्यानंतर आता संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथेवरील 'आनंदडोह' या नव्या चित्रपटाची घोषणा लांजेकर यांनी केली आहे. या चित्रपटाचे आकर्षक मोशन पोस्टर नुकतंच रिलीज करण्यात आलं आहे. ‘साईराम एंटरप्राईजेस’ निर्मित, योगेश सोमण लिखित आणि दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित 'आनंदडोह' हा संतपट २०२५ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अविनाश शिंदे यांनी या चित्रपटाची निर्मितीची जबाबदारी उचलली आहे. मुक्ता बर्वे, योगेश सोमण, अजय पूरकर, समीर धर्माधिकारी, आदिनाथ कोठारे हे कलाकार या चित्रपटात दिसणार आहेत.

जगद्गुरु तुकाराम महाराजांची अभंगगाथा हा अभिजात मराठी साहित्यातील मैल्यावान ठेवा आहे. तत्कालीन समाजव्यवस्थेशी टक्कर देताना त्यांनी बहुजन समाजाला ज्ञानमार्ग दाखवणारे अनेक अभंग रचले. त्यांच्या ३००० हून अधिक अभंगातून आजही आपल्याला जगण्याची प्रेरणा आणि योग्य दिशा मिळत असते. या अभंगगाथेतल्या तत्वज्ञानाला तत्कालीन रूढीवादी तथाकथित धर्म पंडितांनी विरोध केला. संत तुकाराम महाराजांची ही गाथा इंद्रायणी नदीच्या डोहात बुडवून टाकण्यात आली. तरीही संत तुकारामांच्या भक्तीचा चमत्कार म्हणून हे अभंग इंद्रायणीच्या पाण्यावर तरले, असं म्हटलं जातं. ही अद्वित्तीय अभंगगाथा इंद्रायणीच्या डोहात बुडवल्यापासून ते तरंगेपर्यंतच्या तेरा दिवसात जगदगुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज, त्यांची पत्नी आवली, त्यांचे कुटुंब, संपूर्ण तत्कालीन समाज आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे पाईक या सर्वांवर काय परिणाम झाला याची कथा ‘आनंदडोह’ या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details