मुंबई - Allu Arjun wax statue : साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुन त्याच्या 'पुष्पा'चा सीक्वेल 'पुष्पा: द रुल' च्या आगामी शूटिंग शेड्यूलमध्ये गुंतला असताना कुटुंबासह दुबईत दाखल झाला आहे. त्याच्या काही फोटोंनी चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे. तो इथं मादाम तुसाद संग्रहालयात दाखल झाल्याचं संग्रहालयाच्या वतीनं जाहीर केल्यानंतर चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. अखेर त्याच्या सुंदर मेणाच्या पुतळ्याचे काल लोकार्पण पार पडले आहे.
दुबईच्या मादाम तुसाद संग्रहालयात अल्लू अर्जुनचा पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्यावरील पडदा बाजूला सरकवताना उल्लू अर्जुन हजर होता. आपला पुतळा पाहण्यासाठी अल्लुही उत्सुक झाला होता. अखेर पडदा बाजूला करण्यात आला आणि लाल ब्लेझर, पांढरा शर्ट, काळी पँट आणि पायात बुट परिधान केलेला अल्लू अर्जुन 'पुष्पा'च्या लूकमध्ये 'साला झुकेगा नही' स्टाईलमध्ये दाढीवरुन उलटा हात फिरवतानाच्या पुतळ्याचे दर्शन घडले. यावेळी त्याची मुलगी आर्हा अगोदरच पुतळ्याजवळ 'पुष्पा स्टाईल'च्या पोझमध्ये उभी होती.
दुबईच्या मादाम तुसादमध्ये मेणाचा पुतळ्या उभा राहिला हा प्रसंग अल्लु अर्जुनच्या आजवरच्या वाटचालीतील मैलाचा दगड ठरला आहे. "प्रत्येक अभिनेत्यासाठी हा मैलाचा दगड आहे," असं अल्लुनं आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये म्हटलंय. अल्लूचा 'नृत्याचा राजा' असा उल्लेख करत मादाम तुसादने पुतळ्याच्या लॉन्चिंगनंतर अल्लु अर्जुनच्या मेणाच्या पुतळ्यासह एक इन्स्टाग्राम फोटो पोस्ट केला आहे.
अल्लु अर्जुन दुबईच्या सहलीचा आनंद घेतोय. यावेळी त्याच्याबरोबर त्याची पत्नी स्नेहा रेड्डी आणि मुले अल्लू अयान आणि अल्लू अर्हा देखील आहेत. स्नेहाने अलीकडेच तिच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर दुबईतील त्यांच्या सुट्टीतील कौटुंबिक फोटो शेअर केले आहेत. फोटोत हे जोडपे दुबईतील एका लोकप्रिय रेस्टॉरंटच्या बाहेर त्यांच्या दोन मुलांसोबत पोझ देताना दिसत आहेत. स्नेहाने पांढऱ्या रंगाचा ड्रेस घातला आहे, तर अल्लूने काळी पँट आणि काळ्या गॉगलसह हिरव्या रंगाचा टी-शर्ट घातलेला आहे.