मुंबई - 'पुष्पा : द रुल' चित्रपटाच्या रिलीजची तारीख जवळ येत असताना अल्लु अर्जुननं प्रमोशनचा धमाका लावला आहे. पाटणा येथे भव्य समारंभात ट्रेलर लॉन्च केल्यानंतर 'पुष्पा आणि श्रीवल्ली'चा जलवा केरळच्या कोचीमध्ये पाहायला मिळाला. उत्तर आणि दक्षिणेत जोरदार हवा निर्माण केल्यानंतर 'पुष्पा'ची टीम काल मुंबईत दाखल झाली होती. जबरदस्त डायलॉग आणि गाण्याच्या ठेक्यावर मुबईकरांना खूश करण्यात अल्लु अर्जुन यशस्वी झाला आहे. याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून यात अल्लू अर्जुन काळ्या वेशात चाहत्यांशी संवाद साधताना दिसत आहे. रश्मिकाही त्याच्यासोबत काळ्या रंगाच्या साडीत मॅचिंगमध्ये दिसत आहे.
दरम्यान, मुंबईत जमलेल्या हजारो चाहत्यांसमोर जेव्हा अल्लु अर्जुन अवतरला तेव्हा टाळ्या आणि शिट्ट्यांच्या गजरानं माहोल तयार झाला. जेव्हा त्याला मुंबईकरांनी डायलॉगची फर्माईश केली तेव्हा त्यानं "पुष्पा नाम सुनके फ्लॉवर समझा क्या... फायर हूँ मै, वाईल्ड फायर", असे म्हणताच लोकांनी जल्लोष केला. याआधी अल्लू अर्जुननेही मुंबईत पोहोचताच रश्मिका मंदान्नाबरोबरचा एक फोटो शेअर केला होता. फोटोच्या कॅप्शनमध्ये अल्लू अर्जुनने लिहिले होते की, 'पुष्पा आणि श्रीवल्ली तुमच्या हृदयात त्यांची जागा बनवत आहेत'. कार्यक्रमात अल्लू अर्जुनने रश्मिकाला स्टेजवर डान्स करण्यासाठी आमंत्रित केले, त्यानंतर दोघांनीही 'अंगारों का...' गाण्यावर जबरदस्त डान्स केला.