हैदराबाद - हैदराबाद पोलिसांनी सोमवारी साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनला संध्या थिएटर प्रकरणी समन्स बजावले होते. डिसेंबरमध्ये 'पुष्पा-2' चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीच्या तपासाचा भाग म्हणून या प्रकरणी त्याची चौकशी करण्यासाठी त्याला मंगळवारी पोलीस स्टेशनमध्ये हजर राहण्यास सांगितले होते. आता अल्लू अर्जुन चिक्कडपल्ली पोलीस ठाण्यात पोहोचला आहे. याआधी मीडियानं त्याला घरातून बाहेर पडताना कॅमेऱ्यात कैद केलं होतं.
संध्या थिएटर प्रकरणाच्या चौकशीचा भाग म्हणून अल्लू अर्जुननं आज सकाळी ज्युबली हिल्स येथील त्याचे घर सोडलं. चिकडपल्ली पोलिस ठाण्यात जाण्यापूर्वी त्यांनं पत्नी स्नेहा आणि मुलीची भेट घेतली. तो आपल्या मोजक्या सहकाऱ्यांसह आणि वकिलाबरोबर पोलीस स्टेशनला जात असताना पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. ठिकठिकाणी त्याचे चाहतेही त्याला पाठिंबा देण्यासाठी हजर होते. तो जेव्हा चिकडपल्ली पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाला, तेव्हा आत जाण्यापूर्वी त्यांनं उपस्थित अधिकाऱ्यांना हात जोडून अभिवादन केलं.
काल अल्लू अर्जुनला पोलीस स्टेशनमध्ये हजर राहण्यासाठी समन्स बजावल्यानंतर त्याच्या कुंटुंबात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. यानंतर वकिलांचा एक गट अल्लू अर्जुनच्या घरी पोहोचला होता. या मिटींगसाठी अल्लू अर्जुन हजर होता आणि त्यानं रात्री उशिरापर्यंत वकिलांशी चर्चा केली.
22 डिसेंबरला अल्लू अर्जुनच्या घरावर काही लोकांनी हल्ला केला होता. संध्या थिएटर प्रकरणात रेवती नावाच्या महिलेच्या मृत्यूसाठी हे लोक न्यायाची मागणी करत होते. हैदराबादच्या पश्चिम विभागाच्या डीसीपीनुसार, एक गट हातात फलक घेऊन आणि घोषणा देत अल्लू अर्जुनच्या घरी पोहोचला. त्यातील एकानं कंपाउंडच्या भिंतीवर चढून दगडफेक सुरू केल्यानं सुरक्षा कर्मचाऱ्यांना हस्तक्षेप करावा लागला होता.
त्यानंतर झालेल्या झटापटीत आंदोलकांनी उतारावरील फुलांच्या कुंड्यांचे नुकसान केलं आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांशी झटापट केली. उस्मानिया विद्यापीठ संयुक्त कृती समितीचा (OU-JAC) भाग असल्याचा दावा करणाऱ्या सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मात्र, नंतर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला.